मुंबई : प्रतिनिधी
मूळचे रजपूत असलेल्या हिमांशू रॉय यांचा जन्म मुंबईमध्ये 23 जून 1963 रोजी झाला. त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले. 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या रॉय यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये उल्लेखनिय कर्तव्य बजावले. या काळात त्यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली. जे. डे. हत्याकांड, लैला खान दुहेरी हत्याकांड, विजय पालांडे केस, इस्थेर अनुह्या हत्या, पल्लवी पुरकायस्थ हत्या, शक्तीमिल सामूहीक बलात्कार प्रकरण, तसेच शहरावर झालेल्या 26 11 च्या हल्ल्याचा तपास करत असताना अतिरेकी अजमल कसाब यालाही फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीही हिमांशू रॉय यांच्याच नेतृत्त्वात झाली होती.
कुख्यात मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याचा चालक आरीफ बैल याच्यावर करण्यात आलेला गोळीबार प्रकरणासह 2013 सालच्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची उकल करत विंदू दारासिंहला बेड्या ठोकण्यात रॉय यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. राज्य दहशतवाद विरोधी विभाग (एटीएएस) प्रमुख म्हणून कर्तव्य बजावत असतानाही ते चर्चेत राहीले. त्यानंतर रॉय यांची बदली राज्य पोलीस दलातील अस्थापना विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली.
पिळदार शरिरयष्टी असलेले रॉय हे डॅशिंग आणि तेवढाच शांत, सरळमार्गी पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जात होते. अनेकजण त्यांच्याकडून फिटनेस टिप्स घेत होते. दरम्यान, एकदा घोडेस्वारी करताना ते पडले, या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली. दुखापत बरी होत नसल्याने त्यांनी अधिक तपासण्या केल्या असता त्यांना बोन मॅरो कॅन्सर (हाडांचा कर्करोग) झाल्याचे उघड झाले. तेव्हापासून रॉय हे कोणालाही भेटणे टाळू लागले. त्यांनी कर्करोगाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला होता. या उपचारांसाठी त्यांनी वैद्यकीय रजा घेतली होती.
मुंबईसह विदेशात जाऊन त्यांनी कर्करोगावर उपचार घेतले. सध्या त्यांच्यावर पुण्यामध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर फिट झाल्याचे वाटल्याने त्यांनी पुन्हा जीम जॉईन केली. प्रकृतीतही सुधारणा होत होती, परंतू आजाराने पुन्हा डोकेवर काढले. त्यामुळे रॉय यांना नैराश्याने ग्रासल्याचे बोलले जाते. आत्महत्येच्या आदल्या दिवशीही त्यांनी व्यायाम केल्याची माहिती मिळते. अखेर याच आजारपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत तोंडातून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे बोलले जाते.
झेड प्लस दर्जाची सुरक्षा असलेला अधिकारी..
झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळालेले हिमांशू रॉय हे मुंबई पोलीस दलातील अधिकारी होते. 2014 साली मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्यासह रॉय यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली. रॉय यांनी दहशतवादापासून ते अनेक गंभीर गुन्ह्याची संवेदनशील प्रकरणे हाताळली होती. तसेच रॉय हे एटीएसचे प्रमुख असल्याने सुरक्षेचा आढावा घेत विशेष समितीने रॉय यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली. अतिमहत्वाच्या व्यक्तींना देणार्या येणार्या झेड प्लस सुरक्षेमध्ये 36 पोलिसांचा समावेश असतो. घरापासून कार्यालयापर्यंत, तसेच ही व्यक्ती ज्याठिकाणी जाईल तेथे सतत 24 तास बुलेटप्रूफ गाडीसह ही सुरक्षा पुरविली जाते.