Wed, Mar 27, 2019 00:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोहराबुद्दीन प्रकरण : सीबीआयची भूमिका संशयास्पद

सोहराबुद्दीन प्रकरणी CBIची भूमिका संशयास्पद

Published On: Jan 20 2018 1:50AM | Last Updated: Jan 20 2018 9:57AMमुंबई : प्रतिनिधी

बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान न देणार्‍या सीबीआयची भूमिका संशयास्पद आहे.असा आरोप करून आव्हान देण्याचे सीबीआयला निर्देश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने दाखल केलेली ही याचिका सोमवार 22 जानेवारी रोजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाच्या  निर्दशनास आणून देण्यात येणार आहे.

सीबीआय देशात मुख्य तपास यंत्रणा म्हणून ओळखली जाते.कोणत्याही प्रकारचा तपास करताना कायद्यातील तरतुदींचे पालन करणे या यंत्रणेचे कर्तव्य आहे. मात्र सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सीबीआयला आपल्या कर्तव्याचा विसर पडला, असा दावा वकील संघटनेने आपल्या याचिकेत केला आहे़  2005 मध्ये गुजरात व राजस्थान पोलिसांनी संशयित दहशतवादी सोहराबुद्दीन शेख याला त्याची पत्नी कौसर बी आणि साथीदार तुलसी प्रजापती यांना बनावट चकमकीत ठार मारले गेले.

सीबीआयने फेब्रुवारी 2010 मध्ये या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी स्वीकारली आणि त्याचवर्षी जुलैमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह  23 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले़  मात्र मुंबई सत्र न्यायालयाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात दाद मागणे गरजेचे होते. मात्र सीबीआयने ती अद्याप मागितलेली नाही.