होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉगः स्वबळ आधीपासूनच! उद्धव नवीन काय बोलले?

ब्लॉगः स्वबळ आधीपासूनच! उद्धव नवीन काय बोलले?

Published On: Jan 23 2018 9:07PM | Last Updated: Jan 24 2018 8:46AMमुंबई : उदय तानपाठक

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात स्वबळाची भाषा केली असली, तरी त्यात नवीन काहीही नव्हते, त्यामुळेच कदाचित भाजपकडून फारशा गांभीर्याने घेतले गेले नाही. मात्र, नव्या नेत्यांची निवड करताना आदित्य ठाकरेंच्या ताजपोशीबरोबरच आणखी काहीजणांना बढती देऊन आपल्यावर घराणेशाहीचा आरोप होणार नाही, याची काळजी उद्धव यांनी घेतली आहे. त्याचबरोबर यापुढे केवळ मुंबईत नव्हे, तर राज्यात आणि देशातही पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार पक्ष नेतृत्वाने केल्याचे दिसते.

वाचा : लोकसभा, विधानसभा स्वबळावर : उद्धव ठाकरे 

कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना उद्धव यांनी, 2019 च्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला खरा; पण गेल्या तीन वर्षांतल्या लोकसभा वगळता जवळपास सगळ्याच निवडणुका शिवसेनेने स्वतंत्रपणेच लढल्या आहेत. अन्य राज्यांतही आता शिवसेना निवडणुका लढवणार असल्याचे उद्धव यांनी म्हटले असले, तरी गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत शिवसेना आधीही लढलीच आहे. त्यामुळेच आज पक्षाच्या नेतृत्वाने नवीन काय सांगितले, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

एक महत्त्वाची गोष्ट आज झाली, ती म्हणजे सेनेच्या नेते मंडळात नव्या चेहर्‍यांचा झालेला समावेश! शिवसेनेत नेतेपद हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बाळासाहेब असताना शिवसेनाप्रमुखांनंतर नेताच दुसर्‍या स्थानावर होता. मात्र, बाळासाहेबांचे सहकारी आता वयोमानानुसार थकले आहेत. मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांना प्रकृती साथ देत नाही. त्यामुळे त्यांना आराम देणे अपेक्षितच होते. आता उद्धव यांनी आपली टीम नेतेपदी आणण्याची संधी घेतली आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेचे संजय राऊत आणि चार-पाच नेतेच खर्‍या अर्थाने काम करीत होते. त्यामुळे वाढत्या जबाबदार्‍या पेलण्यासाठी नव्या नेत्यांना आणणे आवश्यक होतेच.

वाचा : 'गोहत्या बंदीसारखीच थापाबंदी करा'; उद्धव ठाकरे(व्हिडिओ)

आदित्य हे उद्धव यांचे पुत्र. स्वतः बाळासाहेबांनीच आपल्या या नातवाला शिवतीर्थावर हाती तलवार देऊन पक्षाच्या कार्यात आणून परंपरा पुढे नेली होतीच, आता उद्धव यांनी याच परंपरेतले पुढचे पाऊल टाकले आहे. मात्र, आदित्य यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या कामात पूर्ण लक्ष घालायला सुरुवात केली होती. उद्धव यांना दगदग होऊ नये, यासाठी आदित्य यांनी मोठाच हातभार लावला आहे. आता त्यांना युवासेनेच्या अध्यक्षपदासोबत शिवसेनेच्या नेतेपदाची जबाबदारी देऊन थेट राजकारणात आणले आहे.शिवाय, मराठवाड्यातून चंद्रकांत खैरे, विदर्भातून आनंदराव अडसूळ, कोकणातून अनंत गीते आणि ठाण्यातून एकनाथ शिंदे यांनाही बढती देण्यात आली आहे. खैरे यांनी निवड जाहीर होताच उद्धव यांच्या पायावर ज्या पद्धतीने डोके टेकवले, ते पाहून यापुढे त्यांची वाटचाल कशी राहणार, याचेच दर्शन झाले. एकनाथ शिंदे हे ठाण्यातले ताकदवान नेतृत्व. आनंद दिघे यांच्या  पठडीत तयार झालेल्या शिंदे यांनी ठाण्याचा गड अधिक मजबूत केला, शिवाय मंत्री म्हणूनही चांगले काम केले. त्यांना त्याचेच फळ मिळाले आहे. मात्र, आज शिंदे यांची निवड जाहीर होण्याआधी त्यांना एका गटाचा विरोध असल्याच्या बातम्या चॅनेल्सवर दाखवल्या गेल्या, त्यामागे पक्षातलेच कुणी असावे, असा संशय व्यक्‍त केला जातो आहे.

वाचा : ठाण्यातील रिक्षाचालक शाखाप्रमुख ते शिवसेना नेते

आजची सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे, उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे सचिव होणे ही! राज ठाकरेंपासून नारायण राणे यांच्यापर्यंत अनेकांनी पक्ष सोडताना याच मिलिंद नार्वेकरांवर आगपाखड केली होती. मात्र, मिलिंद यांनी कधीच जाहीरपणे त्यावर भाष्य केले नाही, ना उद्धव यांनी या आगपाखडीची दखल घेतली. उलट मिलिंद नार्वेकरांवर अधिकाधिक जबाबदार्‍या दिल्या गेल्या. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, सर्वच पक्षांतल्या नेत्यांशी अत्यंत उत्तम संबंध राखून असलेल्या मिलिंद यांनी उद्धव यांनी सोपवलेल्या अनेक कामगिर्‍या लीलया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आता ते अधिकृतपणे शिवसेनेचे सचिव झाले आहेत. म्हणजे आतापर्यंत पडद्यामागे राहून जे काम ते करीत होते, ते आता थेट पडद्यावर येऊन करणार आहेत. या आधी शरद पवारांचे पीए म्हणून काम केलेले दिलीप वळसे-पाटील, गोपीनाथ मुंडे यांचे पीए अमित साटम, गजानन कीर्तीकर यांचे पीए सुनील प्रभू हे राजकारणात आले आणि यशस्वीदेखील झाले. आता मिलिंद नार्वेकर हे काय करतात, हे पाहावे लागेल.
 

वाचा : आदित्य, एकनाथ शिंदे, गीते, खैरेंची नेतेपदी वर्णी