Sun, Aug 25, 2019 03:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईची जीवघेणी लाईफलाईन 

मुंबईची जीवघेणी लाईफलाईन 

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 05 2018 1:27AMमुंबई : संजय गडदे 

मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवास, त्यातून लटकत जाणारे लाखो प्रवासी याविषयी सर्वांनाच कौतुक वाटते. परंतु, दररोज 75 लाख प्रवाशांना सेवा देणार्‍या रेल्वेचे कौतुकाचे दिवस आता संपत आले आहेत. लाखो प्रवासी रोज आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी लोकल आता जीवघेणी ठरू लागली आहे. जुन महिन्यात लोकलमधून पडून 250हून अधिक चाकरमान्यांचा मृत्यू झाला असून 300हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर र्चीालरळ ढीरळप र्ीविरींशी नावाचे एक फेसबुक पेज आहे. या फेसबुक पेजचे अ‍ॅडमिन मंदार अभ्यंकर यांनी ही माहिती पोस्ट केली.

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून धावणार्‍या लोकल या मुंबईच्या लाईफलाईन मानल्या जातात. मात्र याच लाईफलाईन मुंबईकरांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. गर्दी, ट्रेनमध्ये लटकून जाण्याचे प्रमाण, वारंवार होणारा खोळंबा या समस्या नित्याच्याच होऊन बसल्या आहेत. मध्य रेल्वेवर हा ताण सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबईकर रोज जीव मुठीत घेऊनच प्रवास करताना पाहायला मिळत आहे. दररोज सरासरी 8 या प्रमाणे रेल्वेतून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण आहे, तर जखमी होण्याचेही प्रमाण सरासरी 10च्या पुढे आहे. परंतु ही बाब रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. यातील अनेक मृत्यू हे मध्य रेल्वे मार्गावर होत असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट समजते. त्यामानाने पश्‍चिम रेल्वे मार्गावर लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. मागच्या जुन महिन्यात याच तीनही मार्गांवर लोकलमधून पडून एकूण 250 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 300हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रत्येक वर्षी विविध अपघातात तीन ते चार हजार प्रवाशांचा मृत्यू होतो. हे बहुतांश अपघात रेल्वे रूळ ओलांडताना, लोकलमधून पडून होतात. लोकलमधून प्रवास करताना दरवाजाजवळच उभ्या असणार्‍या प्रवाशांना खांबांची धडकून अपघात होणे हेही नित्याचेच. वर्षांला किमान 20 पेक्षा जास्त प्रवाशांना त्यामुळे प्राणास मुकावे लागते. रेल्वेकडून सर्वेक्षण केल्यानंतर रुळालगतच असलेले धोकादायक खांब हटविण्यात आले. परंतु, अजूनही खांबांवर आदळून प्रवाशांचे मृत्यू होत आहेत. प्रवाशांचा हलगर्जीपणा त्यास कारणीभूत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. परंतु, इतर अपघातांचे काय? मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अपघाताचे सत्र हे सुरूच आहे. रुळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यात रेल्वेला यश आलेले नाही. ते कसे कमी होतील, याच्या चिंतेत मध्य व पश्चिम रेल्वे आहे.