Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लास्टिकबंदी: हॉटेल्स उलाढालीत 20 ते 50 टक्के घट

प्लास्टिकबंदी: हॉटेल्स उलाढालीत 20 ते 50 टक्के घट

Published On: Jun 25 2018 1:49AM | Last Updated: Jun 25 2018 1:49AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

प्लास्टिकबंदीचा निर्णय मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांसाठी खूपच तापदायक ठरला. बहुसंख्य मुंबईकर ग्रेव्ही, सांबार आणि चटणी असे पदार्थ हॉटेलमधून मागवतात. मात्र हॉटेल व्यावसायिकांना असे ओले पदार्थ देण्यासाठी शासनमान्य पुनर्वापर योग्य कंटेनर्स न मिळाल्याने त्यांचा पुरवठा ठप्प पडला होता. द्रवरुप पदार्थांचा पुरवठाच न झाल्यामुळे व्यवसाय 20 ते 50 टक्के  घटल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांची संघटना आहारच्या सदस्यांनी दिली. 

स्विगी हे संकेतस्थळ खाद्यपदार्थांचा ऑनलाईन पुरवठा करते. ग्राहकांच्या ऑर्डर्स रद्द होण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आपल्या हॉटेल भागीदारांना स्विगीने द्रवरुप पदार्थ ‘आऊट ऑफ स्टॉक’ किंवा ‘आऊटलेट शट’ मार्क करण्याची सूचना केली. 

आपला होम डिलिव्हरी व्यवसाय तब्बल 50 टक्क्यांनी घटल्याची माहिती ताडदेवच्या नाना चौक  येथील हॉटेल कृष्णा पॅलेसचे मालक सौरभ शेट्टी यांनी दिली. प्लास्टिकबंदीमुळे एका दिवसात आपले 20 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. नवीन कंटेनर्स उपलब्ध नसल्यामुळे सध्या या हॉटेलमध्ये कार्डबोर्ड बॉक्सचा वापर केला जात आहे. लवकरच पातळ कार्डबोर्ड पेपर बॉक्सचा वापर केला जाणार आहे. त्यातून द्रवरुप पदार्थ तासभर झिरपत नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. प्लास्टिक बंदीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर लवकरच एखादा इको फ्रेंडली पर्याय येईल आणि व्यवसाय पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

आहारचे अध्यक्ष संतोष शेट्टी म्हणाले, काही ठिकाणी आमच्या सदस्यांनी ग्रेव्ही घट्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फिश मसालासारखे पदार्थ देताना कमी अडचणी आल्या. प्लास्टिक कंटेनर्सच्याअभावी होम डिलिव्हरी व्यवसाय कोलमडून पडल्याची माहिती बांद्य्रातील सोल फ्रायचे मेल्दन डिकुन्हा यांनी दिली. माटुंग्याच्या मद्रास कॅफेचे देव कामत यांचाही अनुभव असाच आहे. त्यांनीही आपल्या ग्राहकांना ऑर्डर नेण्यासाठी येताना डबे आणण्याची सूचना केली. फोर्टनजीकच्या अपेक्षा रेस्टॉरंटचे लिंगप्पा म्हणतात, या परिसरात बँकांचे प्रमाण अधिक आहे. आपल्याकडे सांबार आणि भाजी यांच्या ऑर्डर्स तुलनेने अधिक असतात. प्लास्टिक बंदीमुळे आपला व्यवसाय 45 ते 50 टक्क्यांनी कमी झाला आहे.

धोबी तलावनजीक एका हॉटेलने ओले पदार्थ देण्यासाठी अ‍ॅल्युमिनिअम फॉईलचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ओले पदार्थ राहू शकले नाहीत. काही हॉटेल्सनी आपल्या डिलिव्हरी बॉईजना स्टीलचे डबे देऊ केले होते. ग्रीन बॅग्जचा नवा साठा सोमवारी बाजारपेठेत दाखल होईल, अशी माहिती अंधेरीच्या गुरुकृपा रेस्टॉरंटचे अक्षय शेट्टी यांनी दिली. ग्रीन बॅग्ज आणि पेपर कंटेनर यामुळे प्रत्येक पार्सलचा खर्च 20 रुपयांनी वाढेल. प्रत्येक पिशवीची किंमत 10 रुपये असून, पेपर कंटेनरची किंमत 4 ते 7 रुपये आहे, असे त्यांनी सांगितले.