Tue, Apr 23, 2019 14:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या व्यापार्‍याचा कर्जतमध्ये खून

मुंबईच्या व्यापार्‍याचा कर्जतमध्ये खून

Published On: May 29 2018 2:14AM | Last Updated: May 29 2018 1:40AMकर्जत : प्रतिनिधी

मुंबई येथील फळ व्यापार्‍याचा दोरीने गळा आवळून खून करून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कर्जत तालुक्यातील खेड येथील भीमा नदीच्या पात्रामध्ये फेकून दिल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत ट्रकचालक असलेल्या आरोपीच्या मुसक्या आळल्या.

हसन उमर शेख (वय 50, रा.मालवाणी मालाड, पश्‍चिम मुंबई) असे खून झालेल्या फळ व्यापार्‍याचे, तर दत्ता भोरे (रा. कवडगाव, ता.जामखेड) असे आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. कर्जतचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी उपविभागीय पोलिस आधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन तासांमध्ये या आरोपीस अटक केली असून, त्याच्या दोन साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी भोरे व दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 302, 210,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलिस पथकात उपनिरीक्षक पालवे, मनोज लातूरकर व इतर कर्मचारी सहभागी होते. 

या बाबत मयताची पत्नी जैबुन हसन शेख यांनी कर्जत पोलिस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. हसन शेख हे गेल्या 20 वर्षांपासून ग्रामीण भागातून फळे खरेदी करून ते मुंबई येथे विकण्याचा व्यवसाय करत होते.  19 मे रोजी नेहमी प्रमाणे फळे खरेदी करण्यासाठी ते बीड जिल्ह्यात आले होते. 24 मे रोजी त्यांनी परळी येथील एका शेतकर्‍याकडून टरबूज खरेदी केल्याचा फोन करून पत्नीस या शेतकर्‍याच्या खात्यावर 1 लाख 10 हजार रूपये टाकण्यास सांगितले. या शेतकर्‍याचा माल 96 हजारांचा झाला होता. यातील उरलेल्या 14 हजारपैकी 10 हजार रूपये पूर्वी शेख यांच्याकडे माल घेवून येणारा दत्ता भोरे या चालकाला मालट्रकमध्ये डिझेल भरण्यासाठी दिले होते. मात्र, हा ट्रक अर्धा रिकामा असल्याने, आणखी माल घेण्यासाठी शेख यांनी पत्नीस 80 हजार रूपये खात्यावर टाकण्यास सांगितले. 25 मे रोजी हसन शेख हे आष्टी (जि.बीड) येथे आले व तेथून पप्पू चांद पठाण यांच्याकडे थांबलो असून, आणखी टरबूज पाहत असल्याचे पत्नीस फोनवरून सांगितले. 

त्यानंतर त्याच दिवशी रात्री 8 वा.पत्नीने हसन यांना फोन लावला असता तो लागला नाही. यानंतर 26 मे रोजी सकाळी 11 वा. फोन लावला असता तेव्हाही लागला नाही. मग पत्नीने जामखेड येथील एजंट वाजिद यांना फोन केला व त्यांच्याकडून दत्ता भोरे याचा फोन नंबर घेतला. त्याला फोन केला असता त्याने शेख हे रात्री आमच्याबरोबर आले नाहीत. त्यांना आष्टी स्टॅण्डवर सोडले असता कोणाच्या तरी मोटारसायकलवर बसून गेले. तुमचा अर्धा भरलेला ट्रक येथे उभा आहे. दुसरा ट्रक पाठवून तुमचा माल घेवून जावा, असे सांगून त्याने फोन बंद केला. परत त्याचा फोन लागला नाही. यानंतर शेख यांचा मुलगा व दोन नातेवाईक मुंबईहून आष्टी येथे आले. तेथून पप्पू यास बोलावून घेतले व जामखेड पोलीस ठाण्यात जावून त्यांच्या मदतीने कवडगाव येथे गेले. तेथे ट्रक व आरोपी दत्ता भोरे मिळून आले. मात्र, भोरे याने पोलिसांना शेख यांच्याबाबत काहीच ठावठिकाणा लागू दिला नाही. त्यानंतर आष्टी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली.