Mon, Jun 24, 2019 16:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईला ‘निपाह’ विषाणूचा अ‍ॅलर्ट

मुंबईला ‘निपाह’ विषाणूचा अ‍ॅलर्ट

Published On: May 23 2018 1:51AM | Last Updated: May 23 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी

केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूची लागण होऊन 13 जणांचा मृत्यू झाला असतानाच यातील रुग्णांवर उपचार करणार्‍या परिचारिकेचाही करूण अंत झाल्याने या साथीचे गांभीर्य वाढले आहे. महाराष्ट्र आणि केरळातील नित्याचे संबंध, दळण-वळण लक्षात घेत मुंबई सतर्क झाली असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वार्ड सज्ज करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व पालिका तसेच प्रमुख शासकीय रुग्णालयांना देखील निपाह बाधीत रुग्णांवर उपचारांसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचा अलर्ट देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी सांगितले.

निपाह विषाणूच्या प्रसाराचा महाराष्ट्राला असलेला संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. संजिवकुमार, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक समितीचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. सतिश पवार आदि यावेळी उपस्थित होते.

विशेषत: केरळ भागातून प्रवास करुन आलेल्या व्यक्तिंमध्ये निपाह सदृष्य लक्षणे आढळल्यास तातडीने दखल घेण्यात यावी. खासगी रुग्णालयातही अशा लक्षणांचे रुग्ण आढळल्यास तातडीने सरकारी रुग्णालयास सूचित करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली. 

निपाह विषाणूचा प्रसार

जागतिक आरोग्य संघटना (डबल्यूएचओ) च्या मते, निपा व्हायरस हा वटवाघळांमधून फळांमध्ये आणि फळांतून प्राणी तसेच माणसांमध्ये पसरतो. पक्षांनी विशेषतः वटवाघळांनी खाल्लेले उष्टी फळे खाल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राण्यांना देखील याची बाधा होऊ शकते. याचा प्रसार 1998 मध्ये सर्वात आधी मलेशियात झाला होता. 2004 मध्ये बांगलादेशात या व्हायरसचा प्रसार झाला होता. निपा विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना देखील लागण होऊ शकते. वटवाघळच्या स्त्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस पिल्याने देखील या विषाणूचा प्रसार होतो.

आजाराची लक्षणे

या विषाणुची लागण झालेल्या रुग्णांना ताप, अंगदुखी, बेशुद्ध पडणे, श्वास घेण्यात अडचण येते आणि मेंदूमध्ये जळजळ व्हायला सुरुवात होते. वेळेवर उपचार मिळाले नाही तर संबंधित व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. आजारावरील उद्रेकात मृत्यूचे प्रमाण 40 ते 70 टक्के असल्याने लगेचच सरकारी रुग्णालयांत उपचार सुरू करावेत. 

संशयित रुग्ण

ताप, प्रचंड डोकेदुखी, झोपळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, शुद्ध हरपणे अशी लक्षणे असणारा कोणताही रुग्ण आणि जपानी मेंदूज्वरा करिता निगेटिव्ह असणे आणि मागील 3 आठवड्यात केरळ मधील कोझिकोडे परिसरात, ईशान्य भारतात अथवा बांगला देश सीमेलगतच्या भागात प्रवासाचा इतिहास असणे. अशा वर्णाचा कोणत्याही रुग्णास संशयित निपा विषाणू रुग्ण म्हणून गृहीत धरावे. असा रुग्ण आढळल्यास या रुग्णास रुग्णालयात भरती करून त्याच्या रक्ताचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अशी घ्यावी काळजी

सुरुवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित काही त्रास होतोय का? हे  तपासून पाहणे अत्यावश्यक आहे.
मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करावी
इंफेक्टेड भागात फिरताना अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणे आवश्यक 
सध्या या विषाणूचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही. 
पडलेली फळं, प्रामुख्याने खजुराचे फळ खाणे टाळा, कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारे किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास विषाणू पसरू शकतो
संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्क टाळणे आवश्यक 
 रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी (ग्लोव्ह, मास्क) घेणे आवश्यक.