Tue, Jul 23, 2019 11:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईची डेथलाईन?

मुंबईची डेथलाईन?

Published On: Aug 19 2018 1:41AM | Last Updated: Aug 19 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईची लोकल म्हणजे मुंबईत कुठेही जलद पोहोचण्याचे साधन. पण हीच लोकल अनेकांना मृत्यूपाशी घेऊन जायलाही कारणीभूत ठरताना पाहायला मिळत आहे. याच मुंबई लोकलच्या तीनही मार्गांवर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 16 दिवसांत 137 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तर 157 प्रवासी जखमी झालेत. इतक्या मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गांवर मृत्यू होत असल्याने मुंबई रेल्वेची लाईफलाईन अशी ओळख आता डेथलाईन होऊ लागली. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवर मृतांची आणि जखमींची संख्या अधिक आहे. 

वाढती प्रवासीसंख्या पाहता रेल्वेत सुधारणे अपेक्षित आहे, मात्र, त्या तुलनेत मुंबईतल्या पायाभूत सुविधा वाढत नाहीत. प्रवाशांची वाढती संख्या आणि ट्रॅकच्या संख्येत वाढ आणि सुधारणा न होणे ही साततत्याने अपघाताची कारणे सांगितली जातात. पण महत्त्वाची तीन कारणे आहेत ती अशी-

1 रेल्वेच्या तीनही मार्गांवर गार्डची संख्या मुळातच कमी आहे. अशातच रेल्वेच्या अनेक फेर्‍या रद्द कराव्या लागत असल्याने पुढील लोकलवर प्रचंड गर्दीचा भार पडतो. मग एक ठरावीक लोकल पकडण्याच्या नादात रेल्वेला प्रचंड गर्दी होते. अशावेळी काही जण दरवाजाला लटकतात.. काही खिडकी आणि दरवाजाचा आधार घेऊन बाहेर लोंबकळतात, अशावेळी अपघात होणे साहजिक आहे.

2 उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक बिघडणे हेसुद्धा अपघाताचे एक कारण होय. अचानक एखादी लोकल 10-12 मिनिटे जरी उशिरा आली तर मग समोर येईल त्या गाडीत चढायचे या आवेशात प्रवासी असतात, तोच आवेश त्यांच्या जीवावर कधीकधी उठतो.. 

3 गर्दीच्या वेळी एखादी गाडी 3 नंबर प्लॅटफॉर्मऐवजी 5 नंबर प्लॅटफॉर्मवर येईल असे जेव्हा घोषित केले जाते आणि अवघ्या काही सेकंदांचा अवधी असतो. तेव्हा पादचारी पुलावरच्या गर्दीऐवजी प्रवासी ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि एखाद्या भरधाव वेगाने येणार्‍या ट्रेनखाली चिरडले
जातात.