Wed, Jul 17, 2019 00:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांनी मोडले मुंबईकरांचे कंबरडे

मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांनी मोडले मुंबईकरांचे कंबरडे

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:54AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांची अक्षरक्षा चाळण झालेली आहे. या सर्व रस्त्यांवर पावसाळ्यात प्रचंड मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात दुचाकी व चारचाकी चालकांच्या कंबरेची हाडे मात्र चांगलीच खिळखिळी होतात. सध्या खासगी व पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये मान, कंबर, पाठदुखी आणि पायाचे सांधेदुखीचे त्रास असणार्‍या रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. सांधेदुखीच्या रुग्णांची संख्या सुमारे 40 टक्क्यांनी वाढली आहे. यात अधिकाधिक तरुण व ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. 

वेगवान वाहने खड्डयात आदळल्याने पाठीच्या मणक्यांवर ताण येऊन वेदना होतात. अशा पाठदुखीकडे दुर्लक्ष केले गेल्याने पाठदुखी विकोपाला जात असल्याचे मसीना रुग्णालयातील अस्थिभंग विभागाचे प्रमुख डॉ. विस्पी जोखी यांनी सांगितले.

मुंबई शहरात विविध आस्थापना किंवा खासगी क्षेत्रात नोकरी करणारे तरुण कामावर बाईकने जात असतात. शिवाय बाईक वेगात पळवण्याची तरुणांमध्ये क्रेझ असते. बाईक पळवताना खड्डयांचा अंदाज न आल्याने बाईक आदळते. नियमितपणे खड्डयांमधून गाडी चालविल्याने पाठीच्या मणक्यावर  ताण येतो, परिणामी त्यांची झिज होऊ लागते. मणक्यावरील हाडांमधील ताण सोसणारा लवचिक भाग सरकतो. अशा परिस्थितीत शस्रक्रिया करुन मणक्यामधील दाबही काढावा लागतो, मात्र शस्रक्रियेने त्रास शंभर टक्के कमी होत नसल्याने त्रास आयुष्यभरासाठी होत असल्याचे डॉ. जोखी सांगतात.

शिवाय पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिकांच्याही आरोग्याच्या अनेक तक्रारी येत असतात. अनेकदा रस्त्यावर चालताना तोल जाऊन खड्डयात पाय मुरगळल्याच्या तक्रारी घेऊन येणार्‍यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याचे समजते. पाय मुरगळल्यामुळे घोट्याजवळ सूज येते. शिवाय अशा परिस्थितीमध्ये अस्थिभंग होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अस्थिभंग शल्यविशारद डॉ. सी. पी. मनवानी यांनी सांगितले.