Fri, Jul 19, 2019 05:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर 4 वर्षांनी अमृता मॅथ्यूजला बेड्या

अखेर 4 वर्षांनी अमृता मॅथ्यूजला बेड्या

Published On: Mar 24 2018 1:51AM | Last Updated: Mar 24 2018 1:05AMमुंबई : अवधूत खराडे

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) गोरेगाव शाखेतून करण्यात आलेल्या एफडी टू ओडी घोटाळ्याप्रकरणी तब्बल चार वर्षांनी अखेर आर्थिक गुन्हे शाखेने धनलक्ष्मी बँकेच्या गोरेगाव शाखेच्या मॅनेजर अमृता मॅथ्यूज (48) आणि घोटाळ्यातील साथीदार संतोष गडगे (42) यांना गुरुवारी सायंकाळी बेड्या ठोकल्या. मात्र पीएनबी अधिकार्‍यांना पोलिसांनी अद्याप अटक केली नसल्याते तापासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शोमॅन इन्फ्रास्टक्‍चर प्रा. लि. कंपनीचा मालक आणि मुख्य घोटाळेबाज मोहम्मद फसीउद्दीन याने विविध बँकातील अधिकार्‍यांना हाताशी धरुन साथिदारांच्या मदतीने करोडो रुपयांचा एफडी टू ओडी घोटाळा केला आहे. सरकारी यंत्रणांसह बड्या संस्था आणि बड्या कंपन्यांना गंडा घालत करण्यात आलेल्या घोटाळ्यातील तब्बल 300 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या 19 प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. 

यातील एका प्रकरणामध्ये व्यावसायिक सुरेश मित्तल (62) यांनी त्यांच्या आयुर्वेद प्रचार संस्थेच्या नावाने पीएनबी बँकेत काढलेल्या 5 कोटींच्या एफडीवर साडेचार कोटींची ओडी मिळवत पैसा लंपास केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अखेर मॅथ्यूज आणि गडगे यांच्या अटकेसाठी किल्ला कोर्टातील 47 व्या न्यायालयाचे अप्पर मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्याकडून ताबा आदेश पत्र घेत त्यांना अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ज्योती एंटरप्रायझेसचे बँक खाते धनलक्ष्मी बँकेत उघडण्यात आले होते. त्यावेळी धनलक्ष्मी बँकेच्या गोरेगाव शाखेच्या व्यवस्थापक अमृता मॅथ्यूज होत्या. त्यांना अटक करण्यात आली आहे. ज्योती एन्टरप्रायझेसमधून ओडीसाठी धनादेश घेऊन येत असलेल्या विमल बारोट याची सर्व कामे मॅथ्यूज यांच्याच सांगण्यावरुन करावी लागत होती असा जबाब बँकेतील कर्मचार्‍यांनी पोलिसांकडे नोंदविला होता.

पीएनबी बँकेसह अन्य बँकातून ज्योती एंटरप्रायझेस आणि इंटीगे्रशन टेक्नॉलॉजी प्रा. लि. च्या याच धनलक्ष्मी बँकेतील खात्यामध्ये ओडीच्या रुपात करोडो रुपये जमा झाल्याचे उघड झाले होते. अखेर चार वर्षांनी या गुन्ह्यात अमृता मॅथ्यूजला अटक करण्यात आली. गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्याने संतोष गडगे यालाही याच गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
 

 

tags : Mumbai,news,punjab, National, Bank,scam, Amrita, Mathews,arrested,