Thu, Mar 21, 2019 23:30
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमित शहांच्या भाषणानंतर युतीची चर्चा पुन्हा सुरू

अमित शहांच्या भाषणानंतर युतीची चर्चा पुन्हा सुरू

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 12:43AMमुंबई : उदय तानपाठक

शिवसेनेने सतत भाजपावर हल्लाबोल सुरू केला असताना राज्यातील राजकीय वार्‍यांची दिशा पाहून आगामी निवडणुकीत शिवसेनेशी जमवून घ्यायचा चंगच भाजपाने बांधला असून भाजपा नेते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार युतीचा प्रस्ताव घेऊन 14 एप्रिल रोजी मातोश्रीवर जाणार आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारीच शिवसेनेशी युती असावी अशी इच्छा व्यक्त केली होती. आमदार आणि खासदारांच्या बैठकीतही अनेकांनी हीच भावना व्यक्त केली. 

निवडणुका जवळ येत असताना विरोधकांनी राज्यभर सरकारविरोधात एकच हल्लाबोल सुरू केला आहे. राज्यातील राजकीय वातावरण त्यानंतर ढवळून निघाले आहे. त्यातच शिवसेनेने सरकारवर कडाडून टीका सुरू केली आहे. विरोधकांच्या हल्ल्यानंतर शिवसेनेशी दुरावलेले संबंध पुन्हा सांधण्यासाठी भाजपाने प्रयत्न चालू केले आहेत. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर पहिली बोलणी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. उद्धव ठाकरे हे उन्हाळी सुटीसाठी जपानला गेले असून पुढच्या आठवड्यात ते परत येणार आहेत. त्यानंतर 14 एप्रिलला आपण मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी पुढारीशी बोलताना दिली. 

दोन्ही पक्षांमधील तणाव निवळून पुन्हा सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांशी युती करूनच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवाव्यात असा भाजपाचा मानस आहे. त्यानुसारच भाजपाने पुढाकार घेऊन युतीची चर्चा सुरू करण्याचे ठरवले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच स्वबळाचा नारा दिला असून आता युती करण्याच्या भाजपाच्या नव्या पवित्र्यानंतर या नार्‍याचे काय होते याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असेल.
 

 

 

tags : Mumbai,news,proposal,Shiv Sena, coalition, in,elections,