Sat, Sep 22, 2018 06:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विकासकांनी दिशाभूल करणार्‍या जाहिराती छापल्याने रेराची कारवाई

विकासकांनी दिशाभूल करणार्‍या जाहिराती छापल्याने रेराची कारवाई

Published On: Feb 10 2018 2:17AM | Last Updated: Feb 10 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी 

प्रकल्पांच्या जाहिरातीमध्ये रेरा नोंदणी क्रमांक आणि संकेतस्थळाची माहिती न देणार्‍या विकासकांविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीकडे (महारेरा) तक्रार केली होती. या तक्रारीची दखल महारेराने घेतली आहे. रेरा कायदा धाब्यावर बसवणार्‍या सहा विकासकांना महारेराने चांगलाच दणका दिला आहे. महारेराने विकासकांना 2  ते 12 लाखांचा दंड ठोठावला आहे.

संपूर्ण राज्यामध्ये महारेरा कायदा लागू झाल्यानंतर विकासकांना प्रकल्पांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी झाल्यावर जाहिराती करण्याबाबतही रेरा कायद्यात काही नियम आहेत. मात्र महारेराकडे नोंदणी झालेल्या प्रकल्पांची नोंदणी करताना महारेराचा नोंदणी क्रमांक आणि संकेतस्थळ  यांची माहिती देणे बंधनकारक आहे. काही विकासक नोंदणी क्रमांक देतात, मात्र संकेतस्थळ नमूद करत नसल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीच्या निदर्शनास आले होते.

याची तक्रार पंचायतीने महारेराकडे केली होती. याची दाखल घेत महारेराने विकासकांना दणका दिला आहे. रेरा कायद्यातून पळवाटा काढणार्‍या विकासकांना या कारवाईमुळे जरब बसणार आहे. या पुढेही अशा विकासकांविरोधात मोहीम सुरूच राहणार असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीने स्पष्ट केले.