Wed, May 22, 2019 11:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रत्नागिरीचे प्रसन्‍न कांबळी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये

रत्नागिरीचे प्रसन्‍न कांबळी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 7:38AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

छंद ही मोठी अजब गोष्ट आहे. कुणाला कसला छंद जडेल आणि तो छंद कुणाला कुठे घेवून जाईल हे सांगणे तसे अवघड. प्रसन्‍न रंगनाथ कांबळी हे रत्नागिरीतील एक अवलिया. त्यांना छंद जडला तो शब्दांशी खेळण्याचा. उभ्या आडव्या चौकोनात शब्दांची रचना करण्याचा. म्हणजेच शब्दकोडी तयार करण्याचा. विविध वृत्तपत्रात तयार केलेल्या शब्दकोड्यांनी प्रसन्‍न कांबळी घराघरात पोहोचले आहेतच. त्यांनी साकारलेल्या 10 हजार अक्षरांच्या जंबो कोड्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली होती. त्यांच्या विक्रमाची नोंद आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. लिम्का बुकात नोंद झालेले ते पहिले आणि एकमेव कोकणवासी आहेत. 

प्रसन्‍न कांबळी हे रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्रात मोदककार म्हणून प्रसिद्ध आहेत. कोकणातील अनेक वृत्तपत्रांना त्यांनी शब्दकोडी पुरवली. 2011 साली 1639 आडवे आणि 1586 उभे असे 10 हजार चौकोनांचे महाकाय शब्दकोडे तयार केले होते. यासाठी त्यांना तब्बल 44 दिवस अहोरात्र मेहनत घ्यावी लागली  होती. एवढे मोठे शब्दकोडे आतापर्यंत कुणीही तयार केले नव्हते. त्यामुळे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने त्याची दखल घेतली होती. भारतीयांनी केलेल्या विविध विक्रमांची नोंद करण्याचा उपक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने सुरु केला आहे. फरिदाबाद येथे कार्यालय असलेले हे पुस्तक नवी दिल्‍लीतील डायमंड बुक प्रायव्हेट लिमिटेडकडून प्रकाशित केले जाते. आतापर्यंत त्याच्या 18 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. यावर्षी प्रसिद्ध होणार्‍या पुस्तकात कांबळी यांच्या महाकाय शब्दकोड्याची नोंद घेतली जाणार आहे. यासंबंधीचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र कांबळी यांना इंडिया बुककडून देण्यात आले आहे.