Sun, Jul 21, 2019 15:00
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उंची वाढण्यासाठी पायाला चिकटवले रबर !

उंची वाढण्यासाठी पायाला चिकटवले रबर !

Published On: May 01 2018 1:39AM | Last Updated: May 01 2018 1:17AMमुंबई : अवधूत खराडे

उंची भरत नसल्याने डोक्यावर विग घालून, पॅकिंग क्लीप चिकटवून, तळपायाला पाच रुपयांची नाणी चिकटवून, बनावट फोटोंच्या आधारे डमी उमेदवार पाठवून तसेच ना शारिरीक, ना लेखी परिक्षा देता थेट मेरीटमध्ये पास करण्याच्या घटनांनी गेल्या वर्षीची पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया गाजली असतानाच यावेळीही पायाला दोन सेंटीमिटरचा रबर चिकटवून उमेदवार पोलीस भरतीत उतरल्याची घटना समोर आली आहे. अंधेरीतील मरोळ पोलीस मैदानावर शनिवारी हा प्रकार उघडकीस आला असून या उमेदवाराविरोधात पवई पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकांमध्ये पोलीस शिपायांच्या रिक्त पदांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून भरतीप्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. यातील मुंबई पोलीस दलामध्ये 1 हजार 137 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येत असून तब्बल सव्वा दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बारावी पास ही पात्रता असलेल्या पोलीस शिपाई या पदासाठी चक्क डॉक्टर, वकील, अभियंते, एमबीए अशा उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याने या भरतीप्रक्रियेला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.

अंधेरी पुर्वेकडील मरोळ पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा रहिवाशी असलेला 25 वर्षीय तरुण अंबादास जाधव हा तरुण उतरला होता. त्याची शारिरीक चाचणी सुरू झाली. येथे कर्तव्यावर असलेले आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण (55) यांनी त्याला उंची मोजण्याच्या लाकडी मोजपट्टीजवळ उभे केले. पठाण यांनी त्याची उंची मोजली असता 165.5 सेमी उंची भरली. मात्र पठाण यांना त्याचा संशय आला.

पठाण यांनी त्याला व्यवस्थीत उभे रहा असे सांगताच जाधव हडबडला. दोन्ही पाय जोडून उभे राहात असताना जाधव याच्या पायाच्या खाली काही तरी असल्याचे पठाण यांनी हेरले. त्यांनी जाधव याचे पाय तपासले असता टाचेला दोन सेंटीमीटर आकाराचे चौकोनी रबराचे तुकडे चिटकवलेले त्यांना दिसले. पठाण यांनी कसून चौकशी केली असता उंची वाढविण्यासाठी दोन्ही रबराचे तुकडे डिंकाने पायांच्या टाचांना चिटकवल्याची कबूली दिली. 

Tags : Mumbai police recruitment, Explosive, type exposed,