Sat, Jun 06, 2020 18:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएनबी घोटाळा ‘ईडी’चे छापे

पीएनबी घोटाळा ‘ईडी’चे छापे

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 15 2018 10:59PMमुंबई : वृत्तसंस्था 

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 11 हजार 500 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या घर आणि कार्यालयांवर सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयने गुरुवारी दिवसभर छापे टाकले. ‘ईडी’ने त्याच्या मुंबईतील चार, सुरतमधील तीन आणि दिल्लीतील दोन ठिकाणांवर  छापे टाकले. याप्रकरणी आणखी काही लोकांना अटक केली जाऊ शकते, असे सीबीआयने स्पष्ट केले. दुसरीकडे ‘पीएनबी’ने आणखी दहा अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. नीरव मोदी याच्या विरोधात मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच ‘ईडी’ने छापेमारी केली.

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेमध्ये 280 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड होताच बँकेने अंतर्गत चौकशी सुरू करून याची तक्रार तपास यंत्रणांकडे केली. तपासात घोटाळ्याची व्याप्ती 11 हजार 500 कोटी असल्याचे उघड होताच नीरव मोदीसह त्याची आई, पत्नी, भाऊ, मामा मेहूल चोक्सी आणि बँकेचे तत्कालीन उपव्यवस्थापक गोकुलनाथ शेट्टी आणि त्यांचे सहकारी मनोज खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जानेवारीतच विदेशात पळाला 

सीबीआयने 29 जानेवारी रोजी नीरव मोदीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वीच एक जानेवारी रोजीच तो विदेशात पळाल्याचे समोर आले आहे. बेल्जियमचा नागरिक असलेला त्याचा भाऊ नीलेशनेही त्याच दिवशी भारतातून पलायन केले. नीरवची पत्नी अमी अमेरिकेची नागरिक असून ती आणि नीरवचा व्यावसायिक भागीदार मेहूल चोक्सी यांनी 6 जानेवारीला पलायन केले. चोक्सी हा गीतांजली ज्वेलर्सचा मालक आहे. या चौघांविरुद्धही सीबीआयने ‘लुक-आऊट’ नोटीस जारी केली आहे. नीरव सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे मानले जाते. ‘ईडी’च्या अंदाजे 60 हून अधिक अधिकार्‍यांनी नीरव मोदी याच्या खासगी मालमत्ता आणि दागिन्यांच्या दुकानांवर छापे टाकले. 

नीरवकडे 12 हजार  कोटींची संपत्ती  

नीरव मोदी हा देशातील मोठा हिरे व्यापारी आहे. त्याला देशातील ‘डायमंड किंग’ असेही संबोधले जाते. 48 वर्षीय नीरव मोदी ‘फोर्ब्ज’ या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. ‘फोर्ब्ज’च्या आकडेवारीनुसार नीरव मोदीकडे जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे. नीरव मोदीची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. ‘नीरव मोदी डायमंड ब्रँड’ या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरूम सुरू केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लक्झरी स्टोअर्स आहेत.

सर्वात मोठा बँक घोटाळा 

देशातील हा सर्वात मोठा बँक घोटाळा मानला जात आहे. यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेचे सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज हिरे व्यापाराने बुडवले होते. 2015 साली बँक ऑफ बडोदाला दिल्लीच्या दोन व्यापार्‍यांनी सहा हजार कोटींचा गंडा घातला होता.