होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डावखरेंच्या नावाने अवयवदान योजना

डावखरेंच्या नावाने अवयवदान योजना

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 1:26AM

बुकमार्क करा
मुंबई ः विशेष प्रतिनिधी

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या नावाने अवयवदान योजना  व स्मृतिग्रंथ तयार करण्याबाबत शासन सर्व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये आयोजित केलेल्या डावखरे यांच्या सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून डावखरेंच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, विरोधी बाकावर असताना विधानसभेतील आपल्या भाषणांचे डावखरे कौतुक करत असत. मुख्यमंत्री म्हणून आता विधान परिषदेतही जाणे होत असल्यामुळे सभागृह चालविण्याची त्यांची पद्धत काही वेगळीच होती. दोन्ही बाजूकडील सदस्यांना सोबत घेऊनच ते काम करत होते. कोणत्याही व्यक्तीला आपल्या प्रेमात पाडणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डावखरे यांच्या स्वभावाचे विविध पैलू उघड केले. ते म्हणाले, शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्यासोबत मैत्री होती. पण त्यांनी स्वपक्षाचा विचार सोडला नाही.ठाण्यात शिवसेनेची ताकद असतानाही पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून डावखरे यांनी पी. सावळाराम यांना ठाणे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी करण्याची किमया करून दाखवली. उपसभापती पदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा वाढविली. विविध सामाजिक घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणार हा नेता होता. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, सभागृहात अवघड प्रसंग निर्माण झाल्यानंतर आपण डावखरेंना पाठवायचो. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राज्यात पाच हजार रुग्णांना विविध शारीरिक अवयवांची आवश्यकता असल्याची माहिती दिली. अशा रुग्णांसाठी डावखरे यांच्या नावाने अवयवदान योजना सुरू करावी, अशी सूचना त्यांनी सरकारला केली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, नीलम गोर्‍हे, भाई जगताप, कपिल पाटील, भाई गिरकर आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.