होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओखी चे सौम्य तडाखे!

ओखी चे सौम्य तडाखे!

Published On: Dec 05 2017 1:59AM | Last Updated: Dec 05 2017 1:59AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

केरळ आणि तामिळनाडूत थैमान घालणार्‍या ओखी चक्रीवादळाचे तडाखे कोकण, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बसू लागले असून समुद्राला उधाण आले आहे. मुंबईलगतच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळू लागल्या आहेत. महानगरात सायंकाळी थंडगार वार्‍यांसह पावसाच्या सरी पडल्या. दरम्यान, कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 6 डिसेंबरपर्यंत ओखीचे वादळ या किनारपट्टीवर घोंघावणार आहे. 

 रायगड जिल्ह्यात उरण समुद्रकिनारी 4 ते 5 छोट्या बोटी बुडाल्या. सुदैवाने या बोटीत कुणीही नव्हते. बुडालेल्या बोटी परत किनार्‍यावर आणण्यात आल्या आहेत. उरण ते मुंबई दरम्यानची प्रवासी लाँच सेवा बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि मुंबई किनारपट्ट्यांवर ओखीचे तडाखे बसण्याची शक्यता असून तेथे सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत. या सगळ्या जिल्ह्यांत पुढच्या 48 तासांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्‍चिम उपनगरात सोमवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगार ते वांद्रेपर्यंत  पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. रात्री 9.30 वाजेपर्यंत पाऊन सुरु होता, त्यामुळे कामावरुन घरी पोहोचताना चाकरमान्याची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली.

दरम्यान मुंबईसह कोकण किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शिक्षण विभागाने सुटी जाहीर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील खबरदारी म्हणून शाळा महाविद्यालये मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती ट्विटच्या माध्यमातून तावडे यांनी दिली आहे. मालवणात पोलिस नौका बुडाली 

सिंधुदुर्ग : मालवणात पोलिसांची गस्तीनौका बुडाली. मात्र, पोलिस बचावले. देवगड बंदरात गुजरातपासून दक्षिणेकडील केरळ व तामिळनाडू राज्यातील मिळून सुमारे एक हजार बोटींनी आश्रय घेतला आहे. वेंगुर्ले किनार्‍यावर बोट व मच्छीमारांच्या जाळ्या वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. मालवणात रविवारी रात्री  आलेल्या समुद्री उधाणाने किनारपट्टीवर हाहाकार उडाला. समुद्राच्या अक्राळविक्राळ लाटांनी अजस्त्र रूप धारण केल्याने त्याचा फटका मालवण-दांडी, मेढा राजकोट,देवबाग मोंडकरवाडी, आचरा, पिरावाडी, जामडूलवाडी, किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसला. समुद्राच्या लाटांची उंची दीड ते दोन मीटर वाढल्याने किनारपट्टीवरील मच्छीमारांवरील संकट वाढले. सोमवारी सकाळी उधाणाचा जोर वाढल्याने मालवण दांडी किनारा येथे समुद्रात नांगरून ठेवलेले रापणीच्या पुष्पलता व दर्यामौज या दोन नौका उधाणात फसल्या.

चक्रीवादळाची भीती कायम

रत्नागिरी : सोमवारी रत्नागिरीतील मिर्‍या आणि भगवती बंदरांत तामिळनाडू, कर्नाटक, केरळ राज्यातील 28 मच्छीमार बोटी आश्रयासाठी आल्या होत्या. या नौकांमध्ये 309 खलाशांचा समावेश आहे.
रायगड किनार्‍याला तडाखा अलिबाग : रायगड किनार्‍यावर रविवारी रात्री ओखी वादळाचा तडाखा बसला. रायगड जिल्ह्यातून मासेमारीसाठी गेलेल्या 250 बोटींपैकी चार दिवसानंतर 243 बोटी माघारी फिरल्या. मात्र, सात बोटी अद्यापही समुद्रात असून त्यांचा संपर्क झाल्याचा दावा मत्स्य विभागाने केला आहे. उरण किनार्‍यावर नांगरून ठेवलेल्या सात बोटी रविवारी रात्री आलेल्या उधाणात वाहून गेल्या. त्यातील सहा बोटी काढण्यात आल्या असून एकीला जलसमाधी मिळाली आहे. ओखी वादळ गुजरातकडे सरकल्याचे संकेत कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आले असल्याने कोकणातील मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे.