Tue, Mar 26, 2019 07:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वच्छतेत मुंबई नंबर वन!

स्वच्छतेत मुंबई नंबर वन!

Published On: May 17 2018 2:21AM | Last Updated: May 17 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी 

स्वच्छतेत मुंबईने पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात घेतलेल्या स्वच्छता सर्वेक्षणांत राज्यांच्या राजधान्यांच्या गटात मुंबई महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. याची अधिकृत घोषणा बुधवारी सायंकाळी दिल्ली येथे करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत. स्वच्छ मुंबईसाठी नागरिकांनी केलेल्या सक्रिय सहकार्याकरिता आयुक्तांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. 2015 मध्ये शहरात दररोज 9 हजार 500 मेट्रीक टन एवढा कचरा निर्माण होत होता. याबाबत महापालिकेने राबविलेल्या उपाययोजना व नागरिकांचे मिळालेले सक्रिय सहकार्य यामुळे कचर्‍याचे हे प्रमाण आता दररोज 7 हजार 100 मेट्रीक टनांपर्यंत खाली आले आहे. या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण, कचर्‍यापासून खतनिर्मिती, जनजागृती, प्रदर्शने आदींचा समावेश आहे. कचरा संकलनाबाबत घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यावर भर देण्यात आला. यानुसार पूर्वी 3 हजार 314 सार्वजनिक ठिकाणी असणार्‍या कचरा संकलन केंद्रांची संख्या आता 941 पर्यंत खाली आली आहे. उद्याने, इमारती, रुग्णालये, कार्यालये आदी 1 हजार 26 ठिकाणी ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प सुरु करण्यात आले. 20 हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराचा भूखंड असणार्‍या सोसायटी अथवा दररोज 100 किलोपेक्षा अधिक कचरा तयार होतो अशा सोसायट्या वा रेस्टॉरंट व मॉल स्तरावर कचर्‍यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले. याचाही सकारात्मक परिणाम कचरा कमी होण्यावर झाला असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले. 

झोपडपट्टी परिसर, चाळी, गावठाणे, छोट्या इमारती इत्यादींमध्येदेखील जनजागृती करण्यात येऊन तेथेदेखील कचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आले. 1 हजार 690 सामुदायिक शौचालये, 898 पे अ‍ॅण्ड युज टॉयलेट आणि 1 हजार 941 वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली. उघड्यावरील हागणदारी आढळून आलेल्या ठिकाणी 940 फिरती शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली. उघड्यावरील हागणदारी असणार्‍या परिसरात जनजागृती करण्यासाठी गुड मॉर्निंग पथकेही कार्यरत आहेत.  सार्वजनिक शौचालये शोधणे सोपे व्हावे यासाठी ऍन्ड्रॉईड अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आला. त्याशिवाय सार्वजनिक शौचालये, पेट्रोलपंप परिसरातील उपलब्ध शौचालये, रेल्वेस्थानक, बसस्थानाकांजवळील शौचालये  गुगल मॅपवर दर्शविण्यात आली. या सर्व उपाययोजनेमुळे मुंबईने पहिला क्रमांक पटकावल्याचे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.