Wed, Mar 27, 2019 00:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणार रिफायनरीवर मुख्यमंत्री ठाम

नाणार रिफायनरीवर मुख्यमंत्री ठाम

Published On: Feb 21 2018 1:47AM | Last Updated: Feb 21 2018 1:43AM मुंबई : विशेष प्रतिनिधी 

रत्नागिरी येथील वादग्रस्त नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात हा प्रकल्प करणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटमध्ये या संदर्भातील सामंजस्य करार केला नसला तरी भविष्यात हा करार केला जाणार असल्याचे सांगत मुंबईतील चेंबूरमध्ये गेल्या 40 वर्षापासून रिफायनरी असतानाही तेथे कुठलीही हानी झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले, रिफायनरीबद्दल काही गैरसमज असतील, स्थानिकांमध्ये भीती असेल तर ती दूर केली जाईल.

मी स्वत: उद्धव ठाकरे आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. आमची कोणावरही प्रकल्प लादण्याची भूमिका नाही. या प्रकल्पाचे फायदे लोकांना पटवून देऊ. लोकांशी चर्चा करुन आणि त्यांचे समाधान करुन प्रकल्प पुढे नेला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाणार रिफायनरीचा सामंजस्य करार समिटमध्ये अखेरच्या दिवशी होणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, सेनेच्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी हा करार करणे टाळले. तथापि भविष्यात हा प्रकल्प पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने नाणारमध्ये सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष अटळ दिसतो. भाजपसोबत आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही या रिफायनरीला विरोध आहे.