होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणारचा विनाशकारी रिफायनरी प्रकल्प शिवसेनेमुळेच

नाणारचा विनाशकारी रिफायनरी प्रकल्प शिवसेनेमुळेच

Published On: Jan 20 2018 1:50AM | Last Updated: Jan 20 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

कोकणात होऊ घातलेला नाणार येथील ग्रीन रिफायनरीचा विनाशकारी प्रकल्प शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते, खा. विनायक राऊत यांनीच राज्यात आणला. यात शिवसेनेच्या नेत्यांनी व मंत्र्यांनी मोठ्याप्रमाणात पैसे घेतले आहेत. या प्रकल्पाच्या नावाखाली शिवसेनेचे लोकच शेतकर्‍यांच्या जमिनी देखील जबरदस्तीने खरेदी करत आहेत. त्यामुळेच या प्रकल्पाला विरोध करणार्‍याना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर बोलावून धमक्या देत असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला.

नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील आंबा, काजू, नारळ, भात या पिकावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळेच राजापूर, देवगड येथील 18 गावातील लोकांनी या प्रकल्पास विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार असेल तर तो होऊ देणार नाही, असे शिवसेना सांगत आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशाने शेतकर्‍यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्या जात आहेत.  नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेकडून होणारा विरोध हा केवळ दिखाऊपणा असल्याची टीका नारायण राणे यांनी मुंबईत केली. कोकणातील विनाशकारी रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात यावा यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आपण मागितली आहे.

त्यांना भेटून स्थानिक शेतकर्‍यांचे म्हणणे मांडण्यात येईल. तसेच या प्रकल्पासाठी जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेणे थांबवावे. ज्या महसूल व पोलीस अधिकार्‍यांनी प्रकल्पाला विरोध करणार्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून जबरदस्तीने लोकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या त्यांची चौकशी करून कारवाईची मागणी देखील करणार असल्याचे राणे म्हणाले.