Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाणीपुरवठ्यात मुंबई पालिका देशात अव्वल

पाणीपुरवठ्यात मुंबई पालिका देशात अव्वल

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 12:53AMमुंबई : प्रतिनिधी 

मुबलक पाणीपुरवठा करणार्‍या शहरांमध्ये मुंबई महापालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल तीन पुरस्कार देऊन, केंद्र सरकारने पालिकेचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे एका सोहळ्यात केंद्रीय जलसंसाधन मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  मुंबईतील दीड कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दररोज 380 कोटी लिटर (3,800 दशलक्ष लिटर) पिण्याचा पाण्याचा पालिका सक्षमपणे व नियमितपणे पुरवठा करते. याबद्दल युनेस्को व केंद्र सरकारच्या सहकार्याने वॉटर डायजेस्टद्वारे दिल्लीत आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात वेगवेगळ्या गटातील तीन पुरस्कार पटकावत महापालिकेने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे.

या तीन पुरस्कारांपैकी पहिला बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनीअर प्रोजेक्ट या गटातील पुरस्कार हा गुंदवली-कापूरबावडी-भांडुप संकुलदरम्यानच्या जलबोगद्यासाठी देण्यातर आला. दुसरा पुरस्कार हा वॉटर रियुज प्रोजेक्ट ऑफ द इयर या गटात पांजरापूर येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुनर्वापर प्रकल्पासाठी प्रदान करण्यात आला. तर तिसरा पुरस्कार हा बेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्ट या गटात भांडुप येथील 90 कोटी लिटर क्षमतेच्या जलप्रक्रिया केंद्राला देऊन महापालिकेच्या पाणीपुरवठाविषयक कार्यांचा देशपातळीवर गौरव करण्यात आला आहे. 

हा पुरस्कार अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे यांनी स्वीकारला. देशभरातील पाणीपुरवठा प्रकल्पांचा विचार करून, पाणी पुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सात सदस्यांच्या परीक्षक मंडळाद्वारे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली. या परीक्षक मंडळात निरी, आय.आय.टी., टेरी, खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

 पहिला पुरस्कार - बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनीअर प्रोजेक्ट

भिवंडी तालुक्यातील गुंदवली पासून सुरू होणारा हा जलबोगदा कापूरबावडीमार्गे भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आला. 15.10 किमी लांबीचा, 6.25 मीटर व्यासाचा हा जलबोगदा जमिनीखाली 120 मीटरवर असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे 6 वर्षांत बांधण्यात  आला.

 दुसरा पुरस्कार - वॉटर रियुज प्रोजेक्ट ऑफ द इयर 

 ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथे पालिकेने उभारलेल्या पाणी पुनर्वापर प्रकल्पासाठी देण्यात आला आहे. भातसा धरणातून मुंबईला दररोज 220 कोटी लिटर पाण्याचा पुरवठा होतो. या पाण्यावर पांजरापूर येथील जल प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेदरम्यान दररोज साधारणपणे 4.5 ते 6 कोटी लिटर एवढे पाणी बाहेर टाकले जात होते. याच पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करून ते पाणी परत वापरण्यायोग्य करण्यासाठी प्रकल्प उभारल्याने या वाया जाणार्‍या पाण्याचाही वापर करणे शक्य झाले आहे. 

 तिसरा पुरस्कार - बेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्ट 

भांडुप येथील 90 कोटी (900 चङऊ) लिटर क्षमतेच्या जल प्रक्रिया केंद्राला देण्यात आला. या जलप्रक्रिया केंदात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जलशुद्धीकरण केले जाते. तसेच प्रक्रिया केंद्रातून बाहेर टाकले जाणारे पाणी देखील पुन्हा-पुन्हा प्रक्रिया करून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो.
 

 

 

 

tags : Mumbai,news,much, Water, supply, top, cities,Mumbai, Municipal, Corporation,