मुंबई : प्रतिनिधी
कुर्ल्यातील एका लहान मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात नेहरूनगर पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात खटला दाखल केलेला आरोपी अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी मुलगा अशिक्षीत आसल्याचा फायदा उठवत पोलिसांनी हा प्रताप केला असून सत्र न्यायालयाने पोलिसांची चांगलीच कानउघडणी करत खटला बाल न्यायालयाकडे वर्ग केला आहे.
विशेष पोक्सो सत्र न्यायालयाच्या न्या. सुरेखा पाटील यांच्यासमोर सुरू असलेल्या खटल्यातील आरोपी हा अल्पवयीन असून पोलिसांनी त्याच्या अशिक्षीतपणाचा फायदा उठवत त्याचे वय जास्त दाखवल्याचे कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट करत वकील प्रकाश सलसिंगीकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
आरोपी बालगुन्हेगार असताना पोलिसांनी त्याला जाणूनबुजून जेलमध्ये धाडले. तेथील सराईत गुन्हेगारांचा त्याच्यावर परिणाम होऊन तो राजस्थानला निघून गेल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कागदपत्रांच्या आधारे आरोपी बाल गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने पोलिसांची चांगलीच कानउघडणी करत खटला बाल न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
मूळचा राजस्थानमधील रहिवाशी असलेला 17 वर्षीय मुलगा नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. कुर्ला पूर्वेकडील एका चप्पल बनविण्याच्या दुकानात तो काम करून आपली उपजीविका चालवायचा. याच परिसरातील एका अल्पवयीन मुलीसोबत त्याची मैत्री झाली. ही मैत्री आई वडिलांना मान्य नसल्याने मुलीने या मुलाशी संबंध तोडले. एका दिवशी या मुलीला बघून तो तिच्याशी बोलायला गेला. आणि नेमके मुलीच्या वडिलांनी त्याला बघितले. वडिलांनी मुलीला सोबत घेत नेहरूनगर पोलीस ठाणे गाठून मुलाविरोधात तक्रार दिली.