Sat, Sep 22, 2018 19:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचा दूधपुरवठा 16 जुलैपासून रोखणार

मुंबईचा दूधपुरवठा 16 जुलैपासून रोखणार

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:31AMमुंबई : प्रतिनिधी

दुधाला अनुदान आणि रास्त दर मिळण्याची मागणी शेतकरी सातत्याने करत आहे. मात्र राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देऊन ते शेतकर्‍याच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा. अन्यथा मुंबईला करण्यात येणारा दूधपुरवठा 16 जुलैपासून रोखण्यात येईल. तसेच राज्यातील दुधाचे संकलनही बंद करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला. 

अनुदानाचा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अन्यथा 16 जुलैपासून मुंबईत दुधाचा एक थेंबही येऊ देणार नाही. त्यासाठी वाट्टेल ते करायची शेतकरी संघटनेची तयारी आहे. वेळप्रसंगी दूध वारकर्‍यांना वाटू, पण मुंबईत येऊ देणार नाही, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. 

दुधाचा उत्पादन खर्च 35 रुपये लिटरवर जाऊन पोहोचलाय. मात्र सध्या शेतकर्‍यांना 15 रुपये दर मिळतोय. याबाबत  दूधसंघाच्या प्रतिनिधीसह प्रत्यक्ष भेटून सरकारला याबाबतची समस्या मांडली होती. यावर सरकारने दुधाच्या भुकटीसाठी 3 रुपये देण्याचा  निर्णय घेतला. त्यासाठी 53 कोटी रुपये खर्चही करण्यात आला आहे. मात्र या 53 कोटी रुपयांपैकी एक रुपयाही दूध उत्पादन करणार्‍यांना मिळाला नाही. 

सरकारने या प्रश्‍नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असताना या प्रश्‍नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच दूधविक्री करायची नाही असा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. दुधाला अनुदान देण्याबरोबर दूध भुकटी, पावडर आणि लोणी जीएसटीमधून वगळण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी दूधदरासंदर्भात बोलूच नये, असे ते म्हणाले.