होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रोचे डबे आता  मेड इन लातूर

मेट्रोचे डबे आता  मेड इन लातूर

Published On: Feb 21 2018 1:47AM | Last Updated: Feb 21 2018 1:30AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेव्दारे पाणी पुरवावे लागलेे होते. रेल्वेने त्यासाठी त्यावेळी वॅगन उलब्ध करुन दिल्या होत्या. तेच रेल्वे मंत्रालय पुन्हा एकदा लातूरच्या विकासासाठी धावून आले आहे. मंगळवारी लातूर येथे मेट्रोचे डबे बनविण्याचा प्रकल्प स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत  करार करण्यात आला.  रेल्वे आणि आणि महाराष्ट्र सरकारमध्ये हा करार करण्यात आला असून 600 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मागील तीन मुख्यमंत्री मराठवाड्याचे असूनही तेथे एकही केेंद्राचा मोठा प्रकल्प आला नाही.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठवाड्यात रेल्वेचा मोठा प्रकल्प आल्याचे पियुष गोयल म्हणाले. पुढच्या 4 ते 5 दिवसात या प्रकल्पासाठी जमीनही हस्तांतरित करण्यात येणार असून केंद्र आणि राज्य सरकारचे डबल इंजिन लावून मराठवाडा आणि राज्याच्या विकासाची गाडी वेगाने पुढे नेऊ, असेही त्यांनी सांगितले. भारतात विविध ठिकाणी मेट्रोचे प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी मेट्रो डब्यांची मागणी होत आहे. यापैकी अर्धी मागणी ही एकट्या महाराष्ट्रातून आहे.

म्हणूनच रेल्वे लातूरमध्ये मेट्रोचे डबे बनवणार आहे. फक्त राज्याचीच नव्हे तर देशाची व जगाची मेट्रो डब्यांची गरज लातूर भविष्यात भागवेल, असा विश्‍वास गोयल यांनी केला. मेट्रो डब्बे बनवण्याची कल्पना ही मुख्यमंत्र्यांचीच होती. जानेवारीमध्ये त्यांनी ती मांडली आणि याबाबत फक्त एका बैठकीतच निर्णय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  मुख्यमंत्री म्हणाले की, मॅग्नेटीक मराठवाड्याचा खरा लाभ हा मराठवाड्याला झाला आहे. रेल्वेच्या या प्रकल्पामुळे 15 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. लातूर, बीड, परभणी या क्षेत्रात रेल्वे आणि मेट्रो कोच बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.