Tue, Jul 23, 2019 16:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत लोकलच्या धडकेने चार भावंडांचा अंत

मुंबईत लोकलच्या धडकेने चार भावंडांचा अंत

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 15 2018 1:30AMमुंबई/कणकवली : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील पश्‍चिम रेल्वेमार्गावर लोकलच्या धडकेत कणकवली तालुक्यातील फोंडाघाट-नवीन कुर्ली वसाहत येथील चार भावंडांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी 5.30 वा. च्या सुमारास कांदिवली-बोरिवली स्टेशनदरम्यान घडला. अपघातात मुंबईत राहणारा सागर संपत चव्हाण (24) व नवीन कुर्ली वसाहत येथील दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (19), साईप्रसाद मनोहर चव्हाण (18),  मनोज दीपक चव्हाण (18) या भावंडांचा दुर्दैवी अंत झाला.  अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नवीन कुर्ली वसाहतीमध्ये शोककळा पसरली आहे. 

कुर्ली गावचे मूळचे रहिवासी असलेले चव्हाण कुटुंबीय हे धरणग्रस्त असून फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत पुनर्वसन क्षेत्रात गेली काही वर्षे घर बांधून राहात आहेत. याच कुटुंबीयातील एका लग्नसोहळ्यासाठी सागर चव्हाण हा नवीन कुर्ली वसाहतीतील आपल्या घरी आला होता. त्याच्या सोबत दत्तप्रसाद, साईप्रसाद हे दोन सख्खे भाऊ व मनोज असे चुलत-चुलत भाऊ मुंबईला निघाले होते. मेंगलोर एक्स्प्रेसने रविवारी रात्री ते कणकवली स्टेशनवरून मुंबईला जाण्यासाठी निघाले. 

दादर स्टेशनवरून सोमवारी पहाटे त्यांनी कांदिवली पोईसर येथील सागर चव्हाण याच्या घरी जाण्यासाठी बोरिवली लोकल पकडली. कांदिवली-बोरिवली स्टेशनदरम्यान सिग्नलला लोकल थांबल्यानंतर चौघांनीही बाहेर उड्या मारत रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरून आलेल्या दुसर्‍या लोकलची धडक त्यांना बसली. ही धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांचा प्रकृती अत्यवस्थ झाल्याने डॉक्टरांना आणण्यास आले.

सख्खे भाऊ असलेल्या दत्तप्रसाद व साईप्रसाद यांचे वडील मनोहर चव्हाण हे एस.टी. कणकवली डेपोत वाहक म्हणून कार्यरत आहेत. दत्तप्रसाद याचे  गारगोटी येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शेवटचे वर्ष होते व साईप्रसाद याने कोल्हापूर कलानिकेतन कॉलेजची परीक्षा दिली होती.  तर मनोज चव्हाण हा राजापूर पाचल येथे अकरावी सायन्समध्ये शिकत होता.  

नातेवाइकांचा घातपाताचा संशय

कोकणातून मुंबईत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या भावासोबत तरुणांचा लोकलच्या धडकेत मृृत्यू झाल्याची बातमी झाला. रविवारी रात्री कणकवली रेल्वे स्थानकात कोकणकन्या एक्स्प्रेसने मुंबईला येण्यासाठी निघाले. ही गाडी दादरला सकाळी सडेपाचला पोहोचते, त्यामुळे ते कांदिवली पोईसरला साडेसात ते आठ वाजेपर्यंत पोहोचतील असे वाटत होते. मात्र ते पोहोचलेच नाहीत. त्यामुळे नातेवाइकांना चिंता वाटू लागली, तेव्हा त्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. पोलिसांनी हा फोन उचलला. त्यावेळी त्यांचा अपघात झाल्याचे सांगितले. मात्र नातेवाइकांनी तो अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला.