Fri, May 24, 2019 07:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साखर कारखाने, सूतगिरण्यांच्या थकहमीसाठी लवाद नेमणार

साखर कारखाने, सूतगिरण्यांच्या थकहमीसाठी लवाद नेमणार

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 12:15AMमुंबई  :  विशेष प्रतिनिधी

राज्यातील बंद पडलेले सहकारी साखर कारखाने व सूतगिरण्यांनी राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या 700 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड होत नसल्यामुळे थकहमी रकमेच्या वसुलीसाठी लवाद नेमण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. राज्यात सहकारी साखर कारखाने व सूतगिरण्या उभारण्यासाठी संबंधित संचालक मंडळांनी राज्य सहकारी बँकेकडुन कर्ज घेतले आहे. उद्योग अडचणीत आल्यानंतरही या बँकेने या आस्थापनांना वेळोवेळी कर्जे दिले आहेत. या दोन्ही कर्जांना सरकारने थकहमी दिली आहे. कर्जदार कारखाने व सूतगिरण्यांनी परतफेड न केल्यास व्याजासह रक्कम परतफेड करण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते; पण हे कर्जदार साखर कारखाने व सूतगिरण्या अनेक वर्षांपासून बंद पडल्यामुळे सध्या कोणीही कर्जाची परतफेड करत नाहीत. यामध्ये मराठवाडा व विदर्भातील साखर कारखाने व सूतगिरण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

या दोन्ही प्रकारच्या आस्थापना सध्या बंद अवस्थेत असल्याने राज्य बँकेचे सुमारे 700 कोटी रुपये अडकून पडले आहेत. ही रक्कम वसुल करण्यासाठी राज्य बँकेने सहकार विबागाकडे तगादा लावला होता. अखेरीस बँकेच्या नवीन प्रशासकीय मंडळाला यश आले असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी प्रशासक मंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत रक्कम वसुलीसाठी अधिकार्‍यानी बँकेची बाजू मांडली, तर सरकारनेही जोरदार बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. दोन्हीकडील चर्चेच्या सुरामधून काहीही निष्पन्न होणार नाही. यावर तोडगा म्हणून लवाद नेमण्याचा निर्णय सहकारमंत्री देशमुख यांनी घेतला. राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे माजी अध्यक्ष विजय अग्रवाल तर शासनाच्या वतीने एका विधी विभाग अधिकार्‍याची नियुक्ती करणार असल्याचे समजते.