Thu, Apr 25, 2019 03:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘समृद्धी’च्या कामाचा मेमध्ये शुभारंभ

‘समृद्धी’च्या कामाचा मेमध्ये शुभारंभ

Published On: Dec 05 2017 1:59AM | Last Updated: Dec 05 2017 1:55AM

बुकमार्क करा

मुंबई ः चंदन शिरवाळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी समजल्या जाणार्‍या नागपूर ते मुंबई या महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत 35 टक्के भूसंपादन झाले आहे. येत्या चार ते पाच महिन्यांमध्ये भूसंपादनाचे काम पूर्ण होणार असून मे (2018) च्या पहिल्या आठवड्यात या द्रुतगती महामार्गाच्या कामाचा नागपूरमध्ये शुभारंभ करण्यात येणार आहे. रशिया, चीन, तुर्कस्तानसह इतर देशांमधील 33 कंपन्यांनी सादर केलेल्या निविदांच्या पात्रतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी 31 जून 2015 रोजी विधानसभेत या महामार्गाची घोषणा केली होती. सुमारे 701 किलोमीटरची लांबी असलेल्या या महामार्गासाठी 9300 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. या मार्गामध्ये 8256 हेक्टर खासगी जमीन आहे. सध्या एमआरडीसीने 2404 हेक्टर भूसंपादन केले आहे. तर राज्य सरकार आणि वनविभागाकडील 1035 हेक्टर जमीन वर्ग करण्याची प्रक्रिया येत्या पंधरा दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. 4 डिसेंबरअखेर 35 टक्के भूसंपादन झाले असून मार्च 2018 अखेर उर्वरित 55 टक्के भूसंपादनाचे टार्गेट पूर्ण करण्यात येणार आहे.

औरंगाबाद व नागपूरमध्ये जमीन खरेदी प्रक्रियेला सुरुवातीला कमी वेग होता. एमएसआरडीसीने चर्चा केल्यानंतर आता शेतकरीच जमीन विक्रीसाठी पुढे येत आहेत.  महामार्गाचे काम सव्वादोन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे; पण एवढ्या मोठ्या लांबीचा महामार्ग बांधण्याचे आव्हान कोणतीही एक कंपनी स्वीकारू शकत नाही. त्यामुळे या कामासाठी 16 कंत्राटदार नेमण्यात येतील. तालुका किंवा जिल्ह्यांच्या सीमा निश्‍चित करून त्यांना कामे विभागून देण्यात येतील. या पद्धतीमुळे मुदतीआधीच काम चांगले होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.