Mon, Sep 24, 2018 01:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई लखलखणार : घणसोलीत जेम्स-ज्वेलरी पार्क

नवी मुंबई लखलखणार : घणसोलीत जेम्स-ज्वेलरी पार्क

Published On: Feb 21 2018 1:47AM | Last Updated: Feb 21 2018 1:34AMमुंबई ; प्रतिनिधी

नवी मुंबई परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच अनेक प्रकल्पांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसराचा विकास झपाट्याने होत असतानाच आता राज्य सरकारने या परिसराची चमक-धमक वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यासाठी घणसोलीत 25 एकरावर सुमारे 13500 कोटींचे ‘जेम्स अँड ज्वेलरी पार्क’ उभारण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ समीटमध्ये या एमओयूवर स्वाक्षर्‍याही करण्यात आल्या आहेत. 

राज्य सरकारला झव्हेरी बाजारात असलेला सोनेबाजार नवी मुंबईत स्थलांतरीत करून एका छताखाली आणायचा आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून राज्य सरकार व जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सील((जीजेईपीसी) यांच्यामध्ये सोमवारी एका एमओयूवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. 
नवी मुंबईतील घणसोली येथे  उभारण्यात येणारे हे जेम्स अँड ज्वेलरी पार्क अत्याधुनिक असून चीनमधील शेनझीन मॉडेलच्या धर्तीवर असेल. यानिमित्ताने देशात पहिल्यांदाच जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभे राहात आहे. 

हे पार्क घनसोलीत उभारण्याबाबत हालचाली सुरू असून त्यामध्ये 4500 युनिटस(उद्योजक) असतील. तसेच त्यामध्ये 90 हजार ते 1 लाख लोकांना रोजगार मिळेल.त्याशिवाय पार्कच्या परिसरातच कारागिरांनाही घरे देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.