Fri, Jul 03, 2020 04:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत पुन्हा वर्दळ; कोरोना वाढण्याचा धोका 

मुंबईत पुन्हा वर्दळ; कोरोना वाढण्याचा धोका 

Last Updated: Jun 06 2020 12:57AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊन शिथिल होताच शुक्रवारी मुंबईच्या वेशींवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मुंबईतील दुकानांनीही शटर उघडण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठांमध्येही वर्दळ सुरू झाली. मात्र  अशी गर्दी वाढू लागताच मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही वाढण्याची भीती महापालिकेने व्यक्‍त केली आहे.

मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे येत्या 10 दिवसात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पुढारीशी बोलताना व्यक्‍त केली.

मुंबईतील चित्रपटगृहासह मॉल, पश्चिम व मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा, मेट्रो रेल्वे सुरू होणार नसली तरी, सोमवारपासून शहरातील दुकाने, टॅक्सी व रिक्षा सुरू होणार आहेत. काही दुकाने शुक्रवारपासूनच सुरू झाली. त्याशिवाय कर्मचार्‍यांची 10 टक्के उपस्थिती ठेवून कार्यालय सुरू करण्यास सांगितले आहे. त्यामुळे मुंबईतील रहदारी व नागरिकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत काही प्रमाणात रूग्णांची संख्या वाढेल, असा अशी शक्यता  अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मात्र मुंबईचा रूग्णसंख्या वाढीचा दर व मृत्यूदरही कमी झाला असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले. 

दुकाने आणि मंडया खुल्या करण्यास परवानगी मिळाल्याने क्रॉफर्ड मार्केटसह बोरिवली मंडईत खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली. लालबाग मार्केटमध्येही अनेक दिवसांनंतर पुन्हा ग्राहकांची गर्दी झाली. शासनाच्या सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याबाबत संभ्रम असल्याने  मुंबईत विविध विभागांमध्ये काही मार्गांवर दोन्ही बाजूंना दुकाने उघडल्याचे चित्र होते. 

महापालिका हद्दींच्या सीमा खुल्या केल्याने मुलुंड टोल नाक्यावरील मुंबईच्या दिशेने येणार्‍या सर्वच लेनसमोर शुक्रवारी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ठाणे, नवी मुंबईस मुंबई उपनगरांतून येणारी वाहने मोठ्या प्रमाणात दक्षिण मुंबईच्या दिशेने धावताना दिसली. 

परिणामी, सकाळीच किंग्ज सर्कल उड्डाणपुलाजवळ वाहतूक कोंडी झाली होती. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरही चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.कोरोना सेंटरसाठी आवश्यक जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने उत्तर मुंबईतून सुसाट येणार्‍या वाहनांच्या वेगाला जेजे रुग्णालय सिग्नलजवळ येताच ब्रेक लागत होता.