Wed, Mar 20, 2019 03:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत ड्रोन मधून झोपड्यांचे सर्वेक्षण

मुंबईत ड्रोन मधून झोपड्यांचे सर्वेक्षण

Published On: Jan 20 2018 2:12AM | Last Updated: Jan 20 2018 1:51AMमुंबई : प्रतिनिधी 

संपूर्ण मुंबईतील झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे 1 लाख 95 हजार झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. हे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी आता प्राधिकरणाने झोपडपट्ट्यांचे अत्याधुनिक तंत्र प्रणाली आणि ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करून झोपडपट्टीस्थित नकाशा तयार करून जलदगतीने डोअर टू डोअर बायोमेट्रिक्स सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षणास शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. 

विक्रोळी पूर्व स्थानकाजवळच्या हरियाली व्हिलेज येथील क्‍लस्टर क्रमांक एस 011 या चार हेक्टर भागाचे सर्वेक्षण शुक्रवारी प्राधिकरणाद्वारे करण्यात आले. हे सर्वेक्षण 15- 15 मिनिटांच्या दोन उड्डाणात पूर्ण करण्यात आले असून सर्वेक्षणात एकूण 50 एकर क्षेत्राचे छायाचित्र संकलित झाले असून सर्वसाधारण 2 हजार 300 झोपड्यांचा अंतर्भाव त्यामध्ये आहे. यासाठी फॅन्टोम 4 प्रो या ड्रोनचा वापर करण्यात आला असून अतिशय अचूक नकाशे जलदगतीने तयार होण्यास याद्वारे मदत होईल, असे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी सांगितले. प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईमध्ये झोपड्यांचे लाईडर अथवा ईटीएस व आधार संलग्न टॅबद्वारे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन डोेअर टू डोअर बायोमेट्रिक्स सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येणार्‍या सर्वेक्षणामुळे सर्वेक्षणास गती येणार आहे.