Thu, Apr 25, 2019 23:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईला ‘ओखी’चा धोका कायम

मुंबईला ‘ओखी’चा धोका कायम

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:47AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

तामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार उडवणारे ओखी चक्रीवादळ मुंबई लगतच्या अरबी समुद्रात काहीसे स्थिरावले आहे. पण या वादळामुळे मुंबईलगतच्या किनार्‍यावर धोका निर्माण झाला असून भरतीच्या वेळेस 4 ते 5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची भीती आपत्कालीन विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई शहराची भौगोलिक रचना विचारात घेता समुद्रकिनार्‍याजवळ राहणार्‍या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

ओखी चक्रीवादळ सध्या मुंबईलगत अरबी समुद्रात दक्षिणेकडे साधारणतः 1000 कि. मी अंतरावर स्थिरावले असले तरी कोकण किनारपट्टीत यामुळे पुढील तीन ते चार दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्याने सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, त्याचबरोबर भरतीच्या वेळेस समुद्रावर जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. वादळाची दिशा कशी रहाणार याकडे हवामान खात्याचे लक्ष असून यासंर्भात देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत. 

चैत्यभूमीवर 6 डिसेंबरला खबरदारी घेण्याच्या सूचना

अरबी समुद्रात 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत अरबी समुद्रात उंच लाटांची भरती येण्याची शक्यता आहे. यामुळे कॅडल रोड व शिवाजी पार्क परिसरात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने 6 डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीवर होणारी आंबेडकरांच्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रकिनार्‍यावर जाण्यास लोकांना मज्जाव करण्यात यावा, अशा सूचना पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिल्या आहेत.