होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या मुंबईत

देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या मुंबईत

Last Updated: Jun 06 2020 1:03AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशातील अन्य शहरांपेक्षा मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत पालिकेच्या वतीने दररोज 4 हजार रुग्णांच्या चाचण्या केल्या जातात. आतापर्यंत दोन लाखाच्या वरती चाचण्या करण्यात आल्या, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने केले आहे.

पालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाली असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र ते वस्तुस्थितीशी विसंगत आहे. पालिकेच्या वतीने दररोज सरासरी 4 हजार चाचण्या केल्या जातात. ही सरासरी कायम असून हे प्रमाण कमी झालेले नाही. 3 फेब्रुवारीला  मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. तर 11 मार्चला पहिला कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. 3 फेब्रुवारी ते 6 मे या कालावधीमध्ये मुंबईत 1 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर 1 जूनपर्यंत 2 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. मुंबईत आत्तापर्यंत सुमारे 2 लाख 12 हजार चाचण्या झाल्या असून हे प्रमाण प्रति दशलक्ष 16 हजार 304 इतके आहे. हे प्रमाण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे.

मुंबईमध्ये 22 वैद्यकीय प्रयोगशाळांमधून कोरोना चाचण्या केल्या जातात. यामध्ये महानगरपालिकेच्या 3, शासनाच्या 5 आणि खाजगी 14  प्रयोग शाळांचा समावेश आहे. या सर्व प्रयोगशाळांची मिळून दैनंदिन चाचणी क्षमता सुमारे 10 हजार असली तरी ही संपूर्ण क्षमता एकट्या मुंबईसाठी नाही. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई वगळता अन्य महानगरपालिका तसेच महाराष्ट्रातील अन्य भागांमधून केल्या जाणार्‍या चाचण्या यासाठी देखील या प्रयोगशाळांची क्षमता उपयोगात येते. त्यामुळे प्रयोग शाळा मुंबईत असल्या तरी त्या केवळ मुंबईतीलच नागरिकांच्या चाचण्या करतात, असे नाही. दैनंदिन चाचण्या करण्याची मोठी क्षमता असलेल्या तीन वैद्यकीय प्रयोगशाळा या नवी मुंबई, ठाणे येथे असून त्यांची क्षमता मुंबई वगळता अन्य क्षेत्रांसाठी उपयोगात येते.