Thu, Aug 22, 2019 08:10



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिव्यांग, वरिष्ठ नागरिकांसाठी 11 विशेष न्यायालये

दिव्यांग, वरिष्ठ नागरिकांसाठी 11 विशेष न्यायालये

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 15 2018 10:47PM



मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील दिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना जलद न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या घटकासंबंधी एक हजारहून अधिक प्रकरणे प्रलंबित असलेल्या ठिकाणी राज्यात 11 विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत  घेण्यात आला. दिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि दुर्लक्षित घटकांशी संबंधित न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे वेळीच निकाली निघावीत, यासाठी जलदगती न्यायालयांच्या धर्तीवर विशेष न्यायालये सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, परभणी, ठाणे, अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद येथे विशेष न्यायालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

या विशेष न्यायालयांसाठी 55 पदांच्या निर्मिती करण्यात येणार असून  वेतनासाठी 3 कोटी 66 लाख 10 हजार, तर इतर प्रशासकीय खर्चासाठी 1 कोटी 12 लाख 61 हजार, अशी एकूण 4 कोटी 78 लाख 71 हजार, इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली. सेंटर फॉर परफेक्ट हेल्थ प्रकल्प आयुर्वेदिक औषध निर्मिती, ध्यानधारणा, योगाभ्यास यासाठी पुणे जिल्ह्यात मावळ येथे प्रायोगिक तत्त्वावर सेंटर फॉर परफेक्ट हेल्थ प्रकल्प उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात प्रथमच उभारण्यात येत असलेल्या या एकात्मिक प्रकल्पासाठी 500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या निकषावर अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात येणार असून उद्योग, पर्यटन व वैद्यकीय शिक्षण धोरणानुसार या प्रकल्पाला लाभ देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशन आणि महर्षी वैदिक हेल्थ प्रा. लि. यांच्याद्वारे सेंटर फॉर परफेक्ट हेल्थ या विशेष घटक यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे.