Mon, Aug 19, 2019 06:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांना अजूनही द्राक्षे आंबटच

मुंबईकरांना अजूनही द्राक्षे आंबटच

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 2:05AMमुंबई : संजय गडदे

सध्या द्राक्षांचा सिझन असूनही मुंबईच्या वाशी व भायखळा बाजारात द्राक्षांची आवक होताना दिसत नाही. परिणामी द्राक्षे चढ्या दरानेच विकली जात असल्याने मुंबईकरांसाठी द्राक्षे अजूनही आंबटच आहेत असे म्हणावे लागत आहे. मुंबईच्या विविध भागातील किरकोळ बाजारात द्राक्षे 140 ते 160 रुपये किलो दराने विकली जात असल्याने अजूनही ग्राहक द्राक्षे खरेदी करताना फारसे दिसत नाहीत. द्राक्षे स्वस्त होण्याची ते वाट पाहत आहेत. 

राज्यातील द्राक्ष उत्पादक पट्ट्यात यंदा 30 ते 35 टक्के उत्पादन कमी आहे. या स्थितीत चांगली गोडी असलेल्या उच्च गुणवत्तेच्या मालाला वाढती मागणी असल्याचे बाजारात पाहायला मिळत आहे. अचानक झालेला अवकाळी पाऊस, झालेली गारपीट यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. नवी मुंबईच्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक, सांगली, तासगाव आदी भागातून द्राक्षांची आवक अल्प प्रमाणात होत आहे. मात्र द्राक्षांचा सिझन असूनही किमती मात्र भरमसाट असल्याने मुंबईकरांना अजूनही द्राक्षांची मजा घेता येत नाही. वाशी येथील बाजारात गुरुवारी द्राक्षांच्या अवघ्या 15 गाड्यांची आवक झाली होती. वाशी व भायखळा येथील घाऊक फळबाजारात 15 किलो द्राक्षांची क्रेट 1000 ते 1200 रुपये दराने विकली जात आहे. उत्पादनात 30 ते 40 टक्के घट झालेली   

असताना बागेचा द्राक्षांचा खुडा वेळेपेक्षा लवकरच आटोपत आहे.  मागिल आठवड्यात नाशिक, सांगली, जालना आदी भागात गारपीट झाल्याने द्राक्षांच्या बागाच्याबागा आडव्या झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेली पिके गारपीटीमुळे मातीमोल झाल्याने सध्या सुरक्षित असलेल्या बागांमधून द्राक्षांची होणारी आवकही मंदावली आहे. शिवाय डिझेल, पेट्रोलचे सातत्याने वाढलेले दर, द्राक्ष तोडीसाठी लागणार्‍या मजुरांच्या रोजंदारीत झालेली वाढ अशा अनेक कारणांनी द्राक्ष गेल्यावर्षीच्या किंमतीपेक्षा यावर्षी 30 ते 40 रुपये अधिक किंमतीनी विकली जात आहेत, असे क्रॉफर्ड मार्केट येथील फळ विक्रेते विवेक फळके यांनी पुढारीशी बोलताना सांगितले. 

15 किलोच्या एक क्रेडमध्ये साधारणपणे दीड ते दोन किलो द्राक्ष गळून पडतात. ही गळून पडलेली द्राक्ष बाजारात ग्राहक खरेदी करत नाहीत. पंधरा किलोची एक क्रेड अकराशे ते बाराशेच्या भावाने खरेदी केल्यावर नुकसान टाळण्यासाठी विक्रेता द्राक्ष चढ्या भावानेच विकत असल्याचे भायखळा येथील फळ विक्रेते सदाशिव कराळे यांनी सांगितले. आठवड्यापूर्वी झालेल्या गारपीटीमुळे द्राक्षांची आवक घटली. परिणामी सिझन असूनही द्राक्ष नेहमीपेक्षा चढ्या दराने विकले जात आहेत. सध्या सोनाक्का जातीचे पिवळे द्राक्ष बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. काळ्या द्राक्षाला फारशी मागणी नसल्याचे शेखर नादीर अली यांनी सांगितले.