Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकरी प्रश्‍नावरून अधिवेशन तापणार

शेतकरी प्रश्‍नावरून अधिवेशन तापणार

Published On: Dec 09 2017 2:08AM | Last Updated: Dec 09 2017 1:53AM

बुकमार्क करा

मुंबई : दिलीप सपाटे 

11 डिसेंबरपासून  नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि शेतकरी आत्महत्यांच्या मद्द्यावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक राहतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची तयारी केली आहे. अधिवेशनापूर्वीच त्यांनी कर्जमाफीपोटी सुमारे 19 हजार कोटी रुपये बँकांकडे पाठविले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पावसाळी अधिवेशनात जूनमध्ये शेतकर्‍यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, तांत्रिक कारणामुळे या योजनेत अडथळे निर्माण झाल्याने प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत. त्यातच सोयाबीन आणि कापसाचे बाजारातील पडलेले भाव, बोंडआळीमुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे झालेले नुकसान यामुळे विरोधकांना आक्रमक होण्याची आयतीच संधी मिळाली.

या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात यवतमाळ ते नागपूर अशी हल्लाबोल यात्रा काढली असून त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेते सहभागी झाले आहेत. 12 डिसेंबरला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त मोर्चा विधानभवनावर धडकणार असून त्याचे नेतृत्व शरद पवार करणार आहेत. सभागृहातही शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर विरोधक आक्रमक असतील. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची हवा काढून घेण्यासाठी अधिवेशनापूर्वीच कर्जमाफीपोटी 19 हजार 500 कोटी रुपये बँकांकडे वर्ग केले आहेत. तसेच हे पैसे तत्काळ शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बोंडआळीमुळे झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोयाबीन आणि कापसाची कमी दरात खरेदी होत आहे. हमीभावापेक्षाही व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना कमी दर दिला आहे. या मुद्द्यावर सरकारला मार्ग काढावा लागणार आहे. विशेषत: भाजपचा गड असलेल्या विदर्भात कापूस आणि सोयाबीन हे प्रमुख पीक असून भाजपला गडातच घेरण्याची विरोधकांची रणनीती आहे.