Wed, Nov 21, 2018 16:27



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळांचे बाह्यमूल्यमापन लांबणीवर

शाळांचे बाह्यमूल्यमापन लांबणीवर

Published On: Feb 10 2018 2:17AM | Last Updated: Feb 10 2018 1:21AM



मुंबई : प्रतिनिधी

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षा होत असल्याने शाळासिद्धी मूल्यांकन प्रक्रियेंतर्गत स्वयंमूल्यमापनात अ श्रेणी मिळालेल्या शाळांचे बाह्यमूल्यमापन विद्या प्राधिकरणाने पुढे ढकलले आहे. यासंदर्भातील परिपत्रक प्राधिकरणाने काढले आहे. शाळासिद्धी मूल्यांकन प्रक्रियेंतर्गत स्वयंमूल्यमापनात अ श्रेणी प्राप्त राज्यभरातील 34 हजार 491 शाळांचे बाह्यमूल्यमापन 10 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत होणार होते.  बाह्यमुल्यमापन करण्यासंदर्भातील राज्याची नियोजन कार्यशाळाही पार पडली होती. जिल्हानिहाय शाळांचे नियोजन तसेच वेळापत्रक प्राधिकरणाने दिले होते. मात्र यासंदर्भात राज्यभरातील मुख्याध्यापकांनी तक्रारी केल्यानंतर आता हे बाह्यमूल्यांकन पुढे ढकलण्यात आले आहे. 

शालेय स्तरावरील मूल्यांकनाचे सर्व निकष व निर्णय रद्द करून केंद्रीय पद्धतीने समृद्ध शाळा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत शाळा सिद्धी अंतर्गत हे नवे मूल्यांकन होत आहे, राज्यातील सर्व शाळांचे शाळा सिद्धी कार्यक्रमांतर्गत स्वमूल्यांकन करणे व त्यापैकी किमान 20 हजार शाळांना समृद्ध शाळा करणे आदी उद्दिष्टे निश्‍चित केली आहेत. शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यभरात गेल्या वर्षी स्वयंमूल्यमापन प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 1 लाख 9 हजार 98 शाळांपैकी 99 हजार 650 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. त्यातील अ श्रेणी प्राप्त शाळांच्या बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये राबविण्याचे नियोजन करण्यात होते मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे बाह्यमूल्यमापन आता दुसर्‍यांदा पुढे  ढकलले आहे.