होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील वृद्ध दाम्पत्य इच्छामरणासाठी राष्ट्रपतींकडे 

‘दोघांनाही एकत्र मृत्यूला कवेत घ्यायचंय’ राष्ट्रपतींकडे याचना

Published On: Jan 11 2018 1:30AM | Last Updated: Jan 11 2018 1:30AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भारतात इच्छामरणाला परवानगी नाही, मात्र दक्षिण मुंबईत ग्रँट रोड येथे वास्तव्य करणार्‍या एका वृद्ध दाम्पत्याने इच्छामरणासाठी राष्ट्रपतींकडे याचना केली आहे. आतापर्यंत आपण आनंदात आयुष्य व्यतीत केल, पुढे जोडीदाराच्या मृत्यूपूर्वी दोघांनीही एकत्र डोळे मिटलेले बरे. आम्हाला सहजीवनाचा सुखान्त करण्याची परवानगी द्या, अशी मागणी 88 वर्षीय नारायण लवाटे आणि 78 वर्षीय इरावती लवाटे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. 

आतापर्यंत आम्ही सोबत आनंदाने आयुष्य घालवले,  जीवनाच्या संध्याकाळी एका जोडीदाराला मृत्यू आला, तर त्यानंतर दुसर्‍याच कसं होणार, हा विचारही नकोसा होतो. त्यामुळे दोघांनाही एकत्र मृत्यूला कवेत घ्यायचं असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापैकी कोणालाही असाध्य आजार नाही. मात्र समाधानात आयुष्य व्यतीत केल्यानंतर वृद्धापकाळात रुग्णालयात खितपत पडून रहावू लागू नये, जोडीदाराच्या मृत्यूचे भय या कारणांमुळे आपण राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची विनवणी केल्याचे म्हटले आहे. 

भारतात कायद्याने इच्छामरणाला मान्यता नाही, यामुळे लवाटे दाम्पत्याने कायदेशीर इच्छामरणासाठी उपाय शोधून काढले आहेत. स्वित्झर्लंडमध्ये कायदेशीर इच्छामरण देणार्‍या एका संस्थेशी त्यांनी संपर्क साधला आहे. इरावती यांच्याकडे पासपोर्ट आहे, मात्र नारायण यांच्या पासपोर्टच नूतनीकरण होत नसल्यामुळे ते परदेशात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या दोघांची सुखान्त करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नसल्याने त्यांनी राष्ट्रपतींकडे याचना केली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांच्याकडेही लवाटे दाम्पत्याने या  इच्छामरणासाठीचा मसुदा पाठविला आहे.