Mon, Jun 24, 2019 21:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन-तीन दिवस तरी मुंबईला दुधाची चिंता नाही

दोन-तीन दिवस तरी मुंबईला दुधाची चिंता नाही

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 17 2018 1:29AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

दूध उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान द्यावे यासाठी राज्यात सोमवारपासून सुरू झालेल्या दूध बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले असले तरी, मुंबई शहराला दररोज पुरवठा केला जाणारा दूधसाठा टँकरद्वारे पोलीस बंदोबस्तामध्ये मुंबईत उतरविण्यात आला, त्यामुळे या बंदची झळ मुंबईकरांना आणखी दोन-तीन दिवस बसणार नसल्याचे समजते.              

सरकारकडून अनुदान मिळावे याकरिता शेतकर्‍यांच्या आंदोलनाला गोकुळने एक दिवस पाठिंबा दिला होता. मात्र, दूध व्यवसायातील एकूण स्पर्धा लक्षात घेता, कोणत्याही दूध संस्थेला आंदोलनात सक्रिय सहभाग घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे ग्रामीण पातळीवरून दूध संकलित करून जिल्हा दूध संघाकडे आणण्याच्या वाहतूक व्यवस्थेत या आंदोलनामुळे काही प्रमाणात अडथळा होण्याची शक्यता आहे . मात्र, आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन राज्यातील दूध उत्पादक संघांनी गेले दोन दिवस ग्राहकांपर्यंत दूध कसे पोहोचेल याची जोरात तयारी केली होती.  

मुंबई शहरात दूध व्यवसायाची मोठी बाजारपेठ आहे. 50 लाख लिटरपेक्षा अधिक बंद पॅकिंगचे दूध विकले जात असल्याने,  खासगी दूध कंपन्या आणि सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या दृष्टीने मुंबईतील दूध ग्राहक हा महत्वाचा विषय मानला जातो. आंदोलन करणार्‍या राजू शेट्टी यांच्या संघटनेने सरकारला  जाग आणून देण्यासाठी मुंबईत येणारे दूध रोखण्याची व्युहरचना केली होती .  मात्र , मुंबईतील ग्राहकांना मंगळवारी सकाळी उपलब्ध होणारा पुरेसा  दूधसाठा मुंबईच्या हद्दीत उतरविण्यात पोलिसांच्या सहकार्यामुळे यश आल्याने मुंबईकरांनी निःश्वास सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहुन दुधाने भरलेला टँकर हा याआधी आपल्या वेळेनुसार येत होते. आंदोलन काळात टँकरची तोडफोड होऊ नये तसेच दुधाची नासधूस होऊ नये या साठी 10 टँकर एकत्र करून त्यांच्या पुढे आणि मागे पोलीस गाडी देण्यात आली कोल्हापूरहुन निघालेल्या 10 टँकर ना सातारा पर्यंत पोलीस बंदोबस्त तिथून पुढे सातारा ते पुणे पर्यत पोलीस बंदोबस्त ही स्थानिक पोलीसांच्या मदतीने घेण्यात आला असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

दुधाची कमतरता भासल्यास भुकटीचा वापर

राज्यातील विविध दूध उत्पादक संघाकडे दोन हजार कोटी किंमतीची दूध भुकटी पावडर शिल्लक असून, या आंदोलन काळात शेतकर्‍यांकडून दूध पुरवठा कमी झाल्यास दूध भुकटीचा उपयोग दूध संस्थाकडून केला जाण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती सूत्रानी  दिली. 

राज्यातील दूध उत्पादक संघाकडून अतिरिक्त दुधापासून तयार केलेली भुकटी दूध पावडर यापूर्वी निर्यात केली जात होती, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भुकटी पावडरचे दर खूप खाली आल्याने, राज्यातील अनेक दूध उत्पादक संघात भुकटीचा साठा शिल्लक राहिला आहे. दोन वर्षांपूर्वी 280 रुपये किलोचा दर होता तो आता 130 रुपयांच्या खाली आला आहे. दरम्यान, शेतकर्‍यांचे दूध आंदोलन चिघळल्यास मुंबईसह राज्यात शेतकर्‍यांकडून मिळणारे ताजे दूध पुरवठ्यामध्ये कमतरता निर्माण झाल्यास भुकटीचा मोठ्या प्रमाणात दूध निर्मितीसाठी करण्यात येईल आणि तो साठा पोलीस बंदोबस्तमध्ये मुंबईसह अन्य शहरात टँकरद्वारे आणला जाईल, अशी तयारी दूध उत्पादक संघाकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.