मुंबई : राजेश सावंत
पश्चिम व मध्य रेल्वेमार्गावर प्रवास करणार्या सुमारे 70 लाख प्रवाशांना पादचारी पुलाची भीती वाटू लागली आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनजवळील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जुन्या पादचारी पुलाचा वापर करताना प्रवाशांना धडकीच भरत आहे. मुंबईतील असे 50 पेक्षा जास्त पूल धोकदायक बनले आहेत. यात दादर स्टेशनचा पूल सर्वाधिक धोकादायक असून येथे चेंगराचेंगरी अथवा एखादी दुर्घटना घडली तर, मुंबईच्या इतिहातील मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे लोकलने प्रवास करणार्या लाखो प्रवाशांची झोप उडाली आहे. मुंबईकरांचा जीव टांगणीला लावणार्या रेल्वे व मुंबई महापालिकेबद्दल चीड निर्माण होत आहे.
दुर्घटनेनंतर गळे काढणार्या राजकीय पक्षांवरही आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणारा आपला नातेवाईक पुन्हा घरी परत येईल, याची खात्रीच आता मुंबईकरांना राहिलेली नाही.
अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम व मध्य रेल्वेचा प्रवास सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रवाशांचा जीव जाऊ लागल्यामुळे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात आली. पण अरुंद पादचारी पुलांकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. प्रत्येक स्टेशनवरील तक्रार बुकामध्ये कमकुवत, अरुंद व थरथरणार्या पुलांच्या शेकडो तक्रारी प्रवाशांनी केलेल्या दिसून येतील. पण रेल्वे प्रशासनानेच नाही तर रेल्वे मंत्रालयानेही आतापर्यंत लोकल फेर्या वाढवण्यावरच भर दिला. त्यामुळे येणार्या काळात रेल्वे अपघातात नाही तर, पूल पडण्याच्या दुर्घटनेत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेमार्गावर दादरसह भायखळा, मस्जिद बंदर, सायन, कुर्ला, घाटकोपर, कांजूरमार्ग, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, हार्बर मार्गावर चेंबूर, गोवंडी, किंग्ज सर्कल तर पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाईन्स, चर्नी रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परेल, एल्फिन्स्टन, दादर, माहीम, बांद्रा, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई, नालासोपारा आदी रेल्वे स्टेशनवरील 50 पादचारी पूल अरुंद आहेत. यातील काही पुलांचे वयोमान 40 वर्षांच्या पुढे आहे. त्यामुळे हे पूल तोडून बांधणेच योग्य असल्याचे रेल्वे अभियंत्यांचेही म्हणणे आहे.
यातील काही पूल पूर्व-पश्चिम जोडणारे असल्यामुळे पुलांवर नेहमीच वर्दळ असते. त्यात प्लॅटफॉर्मवर एकावेळी दोन ते चार लोकल आल्या तर, पुलावरून मुंगीच्या पावलाने चालावे लागत आहे. अनेक पूल प्रवाशांच्या गर्दीमुळे अक्षरश: हलत आहेत. याला मध्य व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्याने दुजोरा दिला आहे. पुलांना दोन्ही बाजूला जिने असल्यामुळे पुलावर आल्यानंतर प्रवाशांना बाहेर जाण्याचा मार्गच सापडत नाही. अशा पुलाची दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.