Tue, Mar 19, 2019 05:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १५ दिवसांत ठेवी परत, अन्यथा शरण येऊ : डीएसके

१५ दिवसांत ठेवी परत, अन्यथा शरण येऊ : डीएसके

Published On: Dec 05 2017 1:59AM | Last Updated: Dec 05 2017 7:15AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

ठेवीदारांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. 15 दिवसांत 50 कोटी रुपये परत करू, अन्यथा पोलिसांच्या स्वाधीन होऊ, अशी लेखी हमी पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी सोमवारी न्यायालयात दिली. तसे प्रतिज्ञापत्रही त्यांनी न्यायालयात सादर केले. ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या डी. एस. कुलकर्णी यांनी ही हमी देताना 50 कोटी रुपये जमा करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी 15 दिवसांचा कालावधी मागून घेतला. न्यायमूर्ती अजय  गडकरी यांनी 19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश देऊन कुलकर्णी यांना दिलासा दिला.

ठेवीदारांच्या सुमारे 200 कोटी रुपयांच्या ठेवी परत न केल्याने पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी वादाच्या भोवर्‍यात अडकले. पुणे जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांच्या वतीने अ‍ॅड. मनोज मोहिते यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली.

ठेवीदारांचे पैसे परत केल्याशिवाय जामीन दिला जाणार नाही अशी ठाम भूमिका न्यायालयाने घेतली. सुरुवातीला 35 कोटी रुपये भरणा करण्याची तयारी कुलकर्णी यांनी दर्शविली. मात्र न्यायालयाने 50 कोटी रुपये निश्‍चित केले. हे 50 कोटी कसे आणि कधी जमा करणार याबरोबरच ठेवीदारांच्या ठेवी कशा परत करणार, अशी विचारणा करून त्यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुलकर्णी यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून सविस्तर माहिती दिली. पंधरा दिवसात 50 कोटी रुपये ठेवीदारांचे आम्ही परत करू, अन्यथा स्वत:हून पोलिसांना शरण जाऊ, अशी हमी कुलकर्णी यांच्या वतीने अ‍ॅड. अशोक मुंदरगी यांनी दिली.