Mon, Mar 25, 2019 09:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धावणारी मुंबई बंदने केली जाम!

धावणारी मुंबई बंदने केली जाम!

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:49AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव येथे एक जानेवारीला दर्शनासाठी गेलेल्या दलित समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदने बुधवारी मुंबईची चौफेर नाकेबंदी केली. आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी उग्र आंदोलने, निदर्शने, दगडफेक करीत लोकल वाहतूक रोखली आणि मुंबईत जाणारे - येणारे मार्गही दिवसभर रोखून धरले. परिणामी, सतत धावणारी मुंबई जागीच थांबली. सायंकाळी भारिप -बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी बंद शांततेत झाल्याचा दावा केला. मात्र, तोपर्यंत एकट्या मुंबईत बुधवारी दिवसभरात 48 हून अधिक बेस्ट बसेस दगडफेकीत फुटल्या आणि तीन चालकही जखमी झाले. 

गोवंडी, धारावी, दहिसर, घाटकोपर येथील रमाबाई नगर, विक्रोळी, कांजूरमार्ग यासह विविध दलित समाजाच्या वस्त्यांमध्ये या बंदनिमित्त दुकाने व व्यवहार पूर्णतः बंद करण्यात आले होते. मुंबई शहरात येणार्‍या वाहनांना अडवण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी पनवेल-शीव महामार्ग, घाटकोपर येथे रमाबाई नगर, वांद्रे कलानगर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग या ठिकाणी रास्ता रोको करुन वाहतूक ठप्प केली. त्यामुळे मुंबईकडे जाणार्‍या व शहरातून बाहेर पडणार्‍या वाहनांची प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली. चेंबूर नाका, पवई आयआयटी व इतर ठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. अनेक ठिकाणी बेस्ट बसेसवर दगडफेक करण्यात आली. घाटकोपर, गोवंडी, मानखुर्द, भांडूप,  मुलुंड पवई, अंधेरीचा काही भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. काही वाहनांच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात तोडफोड करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. वरळी नाका येथे सकाळपासूनच तणावाची स्थिती असल्याने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

घाटकोपर ते असल्फा या स्थानकांदरम्यान दलित संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याने काही काळ मेट्रोची सेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेची वाहतूक दुपारच्या वेळी सीएसटी ते घाटकोपरदरम्यान पूर्णतः ठप्प झाली होती. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. मध्य रेल्वेच्या एकशे दहा फेर्‍या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. लांब पल्ल्याच्या गाड्यांनी जाणार्‍या प्रवाशांना बंदचा फटका बसला. या गाड्या रद्द करण्यात आल्या नसल्या तरी रेल्वे रोकोमुळे वेळापत्रक बिघडल्याने तासन्तास प्रवाशांना प्रतीक्षा करत थांबावे लागले. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर नुकत्याच सुरु झालेल्या एसी लोकलच्या फेर्‍या देखील बंदमुळे रद्द करण्यात आल्या. 

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोरेगाव रेल्वे स्थानकात पुन्हा रेल्वे रोको करण्यात आला. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आणि परिणामी पवईकडील वाहतूक देखील पूर्णतः ठप्प झाली. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील पेट्रोल पंपदेखील बंद करण्यात आले होते. घाटकोपर येथील एलबीएस रोड वर रास्ता रोको करण्यात आला होता. मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या रेल्वे रोकोमुळे रेल्वे वाहतूकीच्या वेळापत्रकाचे पुरते बारा वाजले. 

अनेक शाळाही बंद राहिल्या

आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम शाळा, महाविद्यालयांच्या कामकाजावर झाला. बंदमुळे खबरदारी म्हणून मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा कुठे बंद तर कुठे चालू होत्या. तर स्कूल बस तसेच व्हॅन बंद होत्या मुळे अनेक पालकांनी मुलांना शाळेतच पाठवलेच नसल्याने मुंबईतील बहुतांश खाजगी शाळा बंदच राहिल्या.

महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतर राज्यातील शाळा-महाविद्यालये सुरू राहतील, असे शिक्षण विभागाने मंगळवारी जाहीर केले होते. त्यानुसार सकाळ सत्रातील काही शाळा नेहमीप्रमाणे सुरू राहिल्या. मात्र शाळांत विद्यार्थ्यांची गैरहजर संख्या अधिक होती. ठिकठिकाणी होणारी निदर्शने आणि लोकलचा होणारा खोळंबा पाहता बहुतांश शाळा अर्ध्या दिवसांनी सोडण्यात आल्या. 

दक्षिण मुंबईतील काही शाळा तसेच भायखळा, दादर, कांदिवली, अंधेरी, बोरिवली, दहिसर आदी ठिकाणी सकाळच्या सत्रातील शाळा काही प्रमाणात सुरू होत्या. तर घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खाजगी आणि महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थीच पोहचले नसल्याने शाळाच बंद ठेवण्यात आल्या. मंगळवारपासूनच आंदोलनाला सुरुवात झाल्याने नुकसान टाळण्यासाठी स्कूलबस असोसिएशनने बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने जे विद्यार्थी स्कूलबस, व्हॅनने शाळेत येतात त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतच पाठवले नाही. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गैरहजरच होते. चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, देवनार या भागातील तसेच  पवई, भांडुप येथील शाळांमध्ये मुले 30 टक्केही उपस्थित नसल्याचे शाळांकडून सांगण्यात आले.  या बंदने अनेक विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. बंदला विरोध करण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना ओलीस धरायला नको होते, असे आमदार कपिल पाटील यांनी सांगितले.