Fri, Apr 26, 2019 17:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'रंग दे महाराष्ट्र'; 1 हजार गावे होणार रंगीत!

'रंग दे महाराष्ट्र'; 1 हजार गावे होणार रंगीत!

Published On: Mar 24 2018 11:14AM | Last Updated: Mar 24 2018 11:14AMमुंबई/पुणे : प्रतिनिधी

सामाजिक विकासाच्या मूलभूत पातळीपर्यंत काम करण्यासाठी लोकांना सहभागी करून घेण्याच्या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशन (एमव्हीएसटीएफ) या संघटनेने आंतरराष्ट्रीय रंग दिनानिमित्त रंग दे महाराष्ट्र मोहिमेचे आयोजन केले आहे. दरवर्षी 21 मार्च रोजी  आंतरराष्ट्रीय रंग दिन साजरा केला जातो. 

भारतात यंदा प्रथमच हा दिन साजरा केला जात आहे. यांतर्गत राज्यातील 1 हजार गावे क्रांतिकारी पद्धतीने सुधारण्याच्या ध्येयाचा एक महत्वाचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे एकत्रित विकासात्मक प्रयत्न जगासमोर आणणे ही यामागची मूळ कल्पना आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र सोशल व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन या संघटनेशी कन्साई नेरोलॅक पेण्ट्स लिमिटेड आणि टाटा ट्रस्ट्स यांनी भागीदारी केली आहे. 

 या उपक्रमात 350 शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायती रंगवण्यात येणार आहेत. यात अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, बीड, औरंगाबाद, नांदेड, परभणी, रायगड, नंदूरबार जिल्ह्यांतील 120 ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत. शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि पोषणाहार, लिंग समानता याबाबत जागरूकता केली जाईल.

सामाजिक विषयांवर जनजागृतीसाठी  हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतींच्या इमारतीच रंगीत होणार नाहीत, तर समाजसहभागातून अधिक  जागरुकता निर्माण होईल, अधिक चांगली शिक्षण व्यवस्था जन्माला येईल आणि गावाबद्दलची मालकी भावना निर्माण होईल. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Tags : Mumbai, city, villages, colorful