होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई अन् रशियाचे अनुबंध!

मुंबई अन् रशियाचे अनुबंध!

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 17 2018 1:30AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षांत रशियाने भारताला खूप मदत केली. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावरही रशियाची अमिट छाप आहे. शहरातील विज्ञान, क्रीडा, सांस्कृतिक अशा क्षेत्रांशी संबंधित अनेक ठिकाणांशी रशियाचा थेट संबंध आहे. 

भाभा अणुसंशोधन केंद्र

अणु संशोधन केंद्राला भेट देणारा पहिला विदेशी नेता होण्याचा मान 2000 साली ब्लादिमिर पुतीन यांना मिळाला. 1970 पासून भारत आणि रशिया हे शांतीपूर्ण अणुऊर्जेसाठी परस्परांचे सहकारी आहेत. 1954 साली भाभा अणु संशोधन केंद्राची स्थापना झाली. भारतीय संशोधकांना माहिती आणि ज्ञान मिळावे यासाठी रशियाची अणुऊर्जेसंबंधीची नियतकालिके पुरवण्यात येत होती. 

आयआयटी पवई

स्वातंत्र्याच्या पहिल्या दशकात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पश्‍चिम भारतात जागतिक दर्जाची तंत्रज्ञान संस्था उभारण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी तत्कालिन संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांना मदतीसाठी रशियाशी संपर्क साधण्याची सूचना केली. रशियन तज्ज्ञांचे एक  पथक तीन वर्षे मुंबईत वास्तव्यास होते. 1958 साली पवई आयआयटीत पहिला विद्यार्थी दाखल झाला. शहरातील पहिली कॉम्प्युटिंग अ‍ॅक्टिव्हिटी पवई आयआयटी कॅम्पसमध्येच सुरू झाली. रशियन बनावटीचा मिन्स्क 2 हा संगणक वापरण्यात आला होता. 1974 साली पवई आयआयटीला रशियन बनावटीचा ईसी - 1030 हा संगणक उपलब्ध झाला. 1980 च्या दशकात अनेक भारतीय प्राध्यापकांनी रशियात प्रशिक्षण घेतले. रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी 2010 साली पवई आयआयटीला भेट दिली होती. 

नेहरू सायन्स सेंटर, वरळी

भारताच्या पहिल्या अंतराळ स्वप्नांना रशियाने पंख दिले. राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराला रशियानेच पहिली संधी दिली. 2011 साली पहिले अंतराळवीर युरी गॅगरीन यांचे शिल्प नेहरु सायन्स सेंटरच्या प्रांगणात उभारुन कृतज्ञता व्यक्‍त केली होती. 

रेवदंडा, अलिबागरेवदंडा येथील चौल नावाच्या एका खेड्यात पहिल्या रशियन नागरिकाने 1469 साली आपले पाऊल ठेेवले. अफान्से निकीतीन असे या रशियन प्रवाशाचे नाव. त्याने येथूनच मध्य भारत आणि दक्षिण भारताच्या प्रवासाला सुरुवात केला. त्याच्या रूपाने भारताबद्दलची पहिली लिखित माहिती रशियाला मिळाली. चौल हे भारत आणि रशिया यांच्या संबंधांचे सर्वात पहिले ठिकाण आहे. त्याची आठवण ठेवण्यासाठीच रेवदंडाच्या एसआरटी हायस्कूलमध्ये निकीतीनचे शिल्प उभारण्यात आले आहे.

ब्रेबॉर्न स्टेडियम, चर्चगेट

भारत आणि रशिया यांच्यात फुटबॉलचा मैत्रीपूर्ण सामना 1955 साली मुंबईत झाला होता. 35 हजार फुटबॉल शौकिनांनी या सामन्याला गर्दी केली होती. निकिता सिमोन्यान, बोरिस तातुशिन आणि लेव्ह याशिन या दिग्गज खेळाडूंचा रशियन संघात समावेश होता. त्या संघाने त्या सामन्यात भारताचा पराभव केला. आणि पुढे रशियाचा हाच संघ 1956 साली मेलबॉर्न येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता संघ ठरला होता. 

शिवाजी पार्क दादर 

रशियाचा युरी गॅगरीन हा पहिला अंतराळवीर म्हणून ओळखला जातो. पण 60 च्या दशकात मुंबईत राहणारे लोक सांगू शकतील, मुंबई शहराला भेट देणारा तो पहिला कॉस्मोनॉट होता. ऑक्टोबर 1961 मध्ये गॅगरीन यांनी शहराला भेट दिली. त्यापूर्वी सहा महिने ते अंतराळात गेले होते. त्यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत भाषणही केले होते. या सभेला हजारो लोकांनी गर्दी केली होती. मरीन ड्राईव्ह येथे वास्तव्यास असणार्‍या एका नेत्रतज्ज्ञाने गॅगरीन यांना मेजवानी दिली होती. गॅगरीन यांनी त्यावेळी दिल्‍ली, लखनौ आणि हैदराबाद या शहरांनाही भेट दिली होती. 

हाफकिन इन्स्टिट्यूट

रशियन डॉक्डर वल्देमार हाफकिन यांनी कोलकाता येथे कॉलरावरील लसीचा शोध लावल्यानंतर 1899 साली एक संशोधन संस्था स्थापन केली. मुंबई शहरात प्लेगची साथ पसरली होती. तीन महिन्यांच्या अथक संशोधनानंतर हाफकिन यांच्या पथकाला प्लेगवरील रस शोधण्यात यश आले. या लसीचा पहिला प्रयोग हाफकिन यांनी स्वत:वर केला होता. 

लेनिनग्राड चौक, प्रभादेवी

1967 सालापासून मुंबई आणि रशियातील लेनिनग्राड या शहरांचा संबंध आहे. 1995 साली लेनिनग्राडचे नामांतर सेंट पीटर्सबर्ग असे करण्यात आले. आणि त्याचवर्षी बॉम्बेचे मुंबई झाले. मात्र अप्पासाहेब मराठे मार्गावरील एका चौकाला लेनिनग्राड चौक असे नाव देण्यात आले. ते आजही 
कायम आहे. 

बॉम्बे हाय

भारताच्या किनार्‍यापासून 170 किमीवर असलेल्या तेलविहीरतही रशियाचे सहकार्य लाभले आहे. तिचा शोध भारत आणि रशिया यांच्या संयुक्‍त पथकाने लावला होता. भारताचा हा बहुमोल खजिना जवळपास अमेरिकेच्या ताब्यात जाणार होता. बॉम्बे हाय भाड्याने घेण्यात अमेरिकेने स्वारस्य दाखवले होते. आमच्याकडे पैसा नाही आणि तेल उत्खननाचा अनुभव नाही, तरीही या तेलसाठ्यासंदर्भातील आमचा निर्णय आम्ही घेणार आहोत, असे भारताने निक्षून सांगितले होते. 1974 साली बॉम्बे हायमधील पहिली तेल विहीर खोदण्यात आली. त्याला रशियाने सहकार्य केले होते.