Mon, Jun 17, 2019 18:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शशि कपूर यांची एक्झिट

शशि कपूर यांची एक्झिट

Published On: Dec 05 2017 1:59AM | Last Updated: Dec 05 2017 1:59AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

हिंदी चित्रपटसृष्टीचा देखणा नायक ठरलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. हसीना मान जायेगी, शर्मिली, ‘दीवार’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘कभी कभी’ यासारख्या अनेक चित्रपटांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटविणार्‍या शशी कपूर यांच्यावर मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून ते आजारी असल्याने कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शशी कपूर यांना 2014 ला फुप्फुसामध्ये जंतुसंसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरीदेखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची तब्येत खालावत राहिली. शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 मध्ये कोलकातामध्ये झाला. आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीवर त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला होता. बॉलीवूडचा चॉकलेट हिरो अशी त्यांची ओळख होती. पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाच्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर काहीसे एकटे एकटेच राहायला लागले होते. त्याचदरम्यान त्यांची प्रकृती खालावली.

शशी कपूर यांना 2011 मध्ये ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने गौरवण्यात   आले होते. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना 2014 साली दादासाहेब फाळके पुरस्कारही जाहीर झाला. 160 चित्रपटांत त्यांनी काम केले असून तीनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षांपासूनच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केली. त्यानंतर ‘श्री 420’ मध्येही ते चमकले. हा गोड दिसणारा, गोड हसणारा छोकरा पुढे त्यांच्या त्याच हास्यासाठी व अवखळपणासाठी प्रसिद्ध झाला.

घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनी जपला. वडील पृथ्वीराज कपूर यांच्यासह थिएटरमध्ये ते बरीच वर्षे रमले. तरुणपणी त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. 1961 साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशी कपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. ‘जब जब फूल खिले’ या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली. ‘जब जब फूल खिले’, ‘प्यार किये जा’, ‘शर्मिली’, ‘अभिनेत्री’, ‘कभी कभी’, ‘बसेरा’, ‘पिघलता आसमान’, ‘रोटी कपडा और मकान’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.

त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्स ऑफिसवर एकच धमाल उडवून दिली. ‘दीवार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘त्रिशूल’, ‘दो और दो पाँच’, ‘नमक हलाल’, ‘सिलसिला’, ‘शान’, ‘कभी कभी’ हे हिट चित्रपट या जोडीने दिले. शशी कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले. शशी कपूर हे देव आनंद व राजेश खन्नांप्रमाणे ‘रोमँटिक हिरो’ म्हणून चाहत्यांत आपले स्थान निर्माण करू शकले. इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. अनेक अमेरिकन व ब्रिटिश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.