Wed, Jul 24, 2019 12:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कामाला लागा नाहीतर बाजूला करू 

कामाला लागा नाहीतर बाजूला करू 

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 12:47AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

आमदार, खासदारांनी आतापासून लोकसभा आणि विधानसभेच्या कामाला लागावे. तुम्हाला जर तुमच्या जबाबदार्‍या पार पाडता येत नसतील तर तुमची जागा घ्यायला अन्य लोक तयार आहेत, असा सज्जड इशारा देत निष्क्रिय आमदार, खासदारांची तिकिटे कापण्याचे संकेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी दिले.  विरोधकांकडून दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम समाजात पक्षाबद्दल भ्रम निर्माण करण्याचे होत असलेले प्रयत्न पाहता बुथ रचनेत या समाजातील कार्यकर्त्यांचाही समावेश करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

महामेळावा झाल्यानंतर अमित शहा यांनी मंत्री, खासदार आणि आमदारांची बैठक घेतली.  आपल्या मतदारसंघात पक्षाची बांधणी करण्याच्या सूचना अमित शहा यांनी दिल्या. तसेच प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पक्षाची कार्यालये असणे आवश्यक आहे. ही कार्यालये 25 मे पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. किमान पक्षाची जिल्हा कार्यालये तरी पूर्ण झालीच पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. आमदार आणि खासदारांनी आपल्या मतदारसंघात पुढील काळात अधिक सक्रिय व्हावे.

ते जर पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणार नसतील तर अन्य लोक त्यांची जागा घ्यायला आहेत. आपल्याला 2019 ची नव्हे तर 2024 ची देखील तयारी करायची आहे. 2014 ला देखील केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आणायची आहे. त्यासाठी कंबर कसा, असे आदेशही त्यांनी दिला. भाजपने 92 हजार बुथची रचना केली आहे. प्रत्येक बुथवर किमान 25 कार्यकर्ते नेमण्यात आले आहेत. या बुथची रचना करताना 12 ते 15 कार्यकर्ते हे दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम समाजातील असावेत. सर्व घटकांना स्थान देण्यात यावे, तसेच शेवटच्या मतदारांपर्यंत संपर्क राहील याकडे लक्ष द्यावे, असे शहा यांनी सांगितले.
 

 

 

tags ; Mumbai,news, Work, for,Lok Sabha,Legislative, Assembly, Ministers, MPs ,MLAs ,meeting,