होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत पाणी तुंबणारच!

मुंबईत पाणी तुंबणारच!

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:15AMमुंबई : राजेश सावंत

मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामांसह अपुर्‍या नालेसफाईमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याची भीती पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह विरोधकांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पावसाळ्याचा सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्याचा दावा करून, यंदा मुंबईत मोठ्याप्रमाणात पाणी तुंबण्याचे स्पष्ट संकेत मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळाले आहेत.

पावसाळा जवळ आला की पालिका प्रशासनाची झोपच उडून जाते. दरवर्षी हिंदमातासह सरदार हॉटेल, परळ, एल्फिन्स्टन पूल, गांधी मार्केट, अंधेरी विरा देसाई रोड, मीलन, अंधेरी व मालाड सबवे आदींसह सुमारे 200 पेक्षा जास्त ठिकाणी पाणी तुंबते. यात यंदा वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामामुळे पाणी तुंबण्याच्या ठिकाणात वाढ होण्याची भीती पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने व्यक्त केली आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तर, पाणी तुंबले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. भाजपानेही अपुर्‍या नालेसफाईमुळे पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली आहे. तर काँग्रेसने मेट्रो रेल्वे व अपुर्‍या नालेसफाईमुळे मुंबई तुंबणार असल्याचा आरोप केला आहे. पाणी तुंबण्याची शक्यता लक्षात घेऊन, पालिका प्रशासनानेही आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. विशेष म्हणजे 225 ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असल्यामुळे या भागात सुमारे 298 पाणीउपसा पंप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण मुंबईत पाणी तुंबले तरी त्याचा त्वरित निचरा होण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचा दावा, प्रशासनाने केला आहे. 

तुंबणार्‍या पाण्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून पालिकेने 298 पंप बसवले आहेत. यात कुर्ला एल विभागात सर्वाधिक 26 पंप असून माटुंगा एफ-उत्तर विभाग हद्दीत 23 पंप बसवण्यात आले आहेत. सांताक्रूझ एच-पश्‍चिम विभागात 18, घाटकोपर (एन विभाग) व मानखुर्द (एम-पश्‍चिम विभाग) प्रत्येकी 14 पंप बसवण्यात आले आहेत. त्याशिवाय ब्रिटानिया, हाजी अली, लव्ह ग्रोव्ह, इर्ला व गझदर बंद (खार) येथे पंपिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहेत.