Fri, Sep 21, 2018 11:24



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक, मतदार यादी जाहीर 

मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक, मतदार यादी जाहीर 

Published On: Dec 10 2017 12:32PM | Last Updated: Dec 10 2017 12:32PM

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाने अधिसभेच्या प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक व अभ्यास मंडळाच्या महाविद्यालयातील विभाग प्रमुख या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आक्षेपानंतर दुरुस्त केलेली तात्पुरती मतदार यादी काल जाहीर करण्यात आली आहे. 

या निवडणुकीची अधिसूचना विद्यापीठाने २ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध केली होती, व तात्पुरती मतदार यादी जाहीर केली होती. यानंतर मतदार यादीस कोणाचे काही आक्षेप असल्यास ते लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याची अंतिम तारीख ६ डिसेंबर २०१७ पर्यंत होती. 

चार घटकाच्या मतदार यादीस विद्यापीठाकडे अनेक आक्षेप प्राप्त झाले. तसेच काही त्रुटी विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आल्या. त्‍यामुळे या त्रुटी व आक्षेपाची छाननी करून तात्पुरत्या स्वरूपातील मतदार यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली आहे. तसेच ही यादी अवलोकनार्थ मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कार्यालयातही उपलब्ध आहे. दुरुस्त केलेल्या मतदार यादीस काही आक्षेप असल्यास कुलगुरूंकडे अपील करता येईल. आवश्यक त्या कागदपत्रांसह हे अपील मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट विभागातील निवडणूक विभागात दिनांक १३ डिसेंबर २०१७ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करता येणार आहे.

अधिसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक व  अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, अशा चार घटकांच्या  प्रतिनिधींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात शिक्षक व  नोंदणीकृत पदवीधर घटकांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अधिसभेवर जाण्यासाठी १९ जागा व अभ्यास मंडळावर जाण्यासाठी ३ अशा एकूण २२ जागा असतील.