Tue, Nov 19, 2019 12:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-ठाणे अवघ्या २१ मिनिटांत 

मुंबई-ठाणे अवघ्या २१ मिनिटांत 

Published On: Jul 13 2019 1:40AM | Last Updated: Jul 13 2019 1:40AM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई ते ठाणे स्थानकादरम्यान जलद भुयारी मार्ग करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. रेल्वेतज्ज्ञ ई श्रीधरन यांनी रेल्वे मंत्रालयाला पाठवलेल्या सूचनेनुसार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून गेल्या काही महिन्यांपासून या शक्यतेचा अभ्यास सुरू आहे. संबंधित प्रस्ताव तयार होऊन त्यास रेल्वे मंडळाची मंजुरी मिळाली, तर मुंबई व ठाणे प्रवास अवघ्या 21 मिनिटांत कापता येणार आहे.

यासंदर्भातील प्राथमिक अहवाल तयार झाला असून अंतिम अहवाल लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर तो रेल्वे मंडळ आणि राज्य सरकारकडे सादर केला जाईल. संबंधित सेवेमध्ये डब्यांची संख्या आणि लोकलचे दर हे नंतर ठरवले जाणार आहेत. तूर्तास तरी अहवाल पूर्ण करून त्यास मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. प्रस्तावास मंजुरी मिळताच पुढील दीड वर्षांत प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.

15 हजार कोटींची गरज

या प्रस्तावानुसार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान भुयारी जलद मार्ग बांधण्यात येईल. सुमारे 33 किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पासाठी एकूण 15 हजार कोटी रुपयांची गरज भासेल. संबंधित प्रस्तावानुसार या जलद मार्गावरील लोकलला सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर आणि ठाणे या पाच स्थानकांवर थांबा देण्यात येईल. तसेच प्रत्येक तासाला अप आणि डाऊन मार्गावरील लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता ही प्रत्येकी 50 हजार प्रवासी इतकी असेल.