Sat, Jul 20, 2019 10:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेल्फीच्या नादातच डहाणूत बोट बुडाली

सेल्फीच्या नादातच डहाणूत बोट बुडाली

Published On: Jan 13 2018 7:20PM | Last Updated: Jan 13 2018 7:20PM

बुकमार्क करा
डहाणू : पुढारी वृत्तसेवा

सगळीकडे भोगी संक्रांतीची धूम असतानाच समुद्र सफारीला बोटींग करीत जाणे पोंदा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भलतेच महागात पडले. शनिवारी सकाळी पारनाका येथील समुद्रात  बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेजच्या ४० विद्यार्थ्यांना घेऊन समुद्र सफारी करणारी बोट उलटून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर सहा विद्यार्थी बेपत्ता आहेत. विद्यार्थी सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यातूनच ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. 

सकाळी ११ वाजता बोट उलटल्याचे  वृत्त पसरताच सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र तटरक्षक दल, मच्छीमार बांधव आणि पोलिस प्रशासनाच्या तत्परतेने मोठी जीवितहानी टळली. केवळ पोहता न आल्याने मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यात जान्हवी हरेश सुरती (रा. मसोली), सोनल भगवान सुरती. रा.मसोली), संस्कृती माह्यवांशी या तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे. किमान सहा विद्यार्थी बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास मच्छीमार बांधव शनिवारी रात्री भरतीच्या वेळीही घेणार होते. थंडीचे दिवस असल्याने मुले समुद्रात असतील तर त्यांचे मृतदेह धाकटी डहाणू ते झाई या किनार्‍यावर दोन दिवसानंतर लागतील, असा अंदाज मच्छिमार संघाचे अध्यक्ष अशोक आंभिरे यांनी व्यक्त केला. 

सेल्फीमुळे बोट कलंडली

बोटीच्या टपावर चढुन सेल्फी घेताना बोटीचा तोल जाऊन बोट एकाच बाजुने लवंडल्याने बोट बुडाल्याचे विद्यार्थी आणी बोटचालकाने सांगीतले. बारावीला शिकणारी आणि मोठ्या नशिबाने बचावलेली डेसी झाईवाला हिने सांगितले की, आम्ही अकरावी आणि बारावीचे वेगवेगळ्या ग्रुपची मुले बोटींगसाठी गेलो होतो. बोट चालकाने  वर जाण्याचा धोका सांगितल्याने आम्ही मुले खालच्या सीटवर बसलो होतो. याचदरम्यान काही मुले सेल्फी काढण्यासाठी टपावर चढली. सेल्फीसाठी एकाच बाजुला मोठ्या संख्येने मुले जमा झाल्याने बोटीचा तोल गेला. बोट फायबरची असल्याने एका बाजूने वजन वाढल्याने कलंडली व काही क्षणात बुडाली. मैनुद्दीन खान याने माझे प्राण वाचवले.

समुद्रात बोट उलटताच नऊ विद्यार्थी पोहत सुखरुप बाहेर निघाले मात्र त्यांनी थेट घर गाठले. बोट चालक सुरेश अंभिरे याने प्रसंगावधान राखत  जीवावर उदार होत बुडणार्‍या  विद्यार्थ्यांना वर उचलून बोटीच्या टपावर पाठवण्याचे धाडस केल्याने अनेकांचे जीव बचावले. काही जणांना पोहता येत नसल्याने त्यांना वाचवणे अशक्य झाले, असे बोटचालक अंभिरे याने सांगितले. बोटीतून बाहेर काढलेल्या ३२ जणांपैकी २१ जणांना कॉटेज हॉस्पीटल डहाणू येथे दाखल केल्याचे पोलिस अधीक्षक मंजुनाथ शिंगे यांनी पत्रकारांना सांगितले. हेमा तांडेलसह दोन मुली अत्यवस्थ असून, त्यांच्यासह सर्व मुलांवर कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुपारनंतर बहुतेकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

जीवन रक्षकांची तत्परता

डहाणूकडे जात असताना सतीपाडा येथून काही लोकांनी विपरित प्रकार पाहुन नंदकुमार विंदे यास  फोन केला. त्यानंतर चंदन मेहेरसह मोटरसायकल घेऊन ते  समुद्राकडे गेले. समोर बोट बुडताना दिसताच सातशे मिटर खोल समुद्रात पोहत जात त्यांनी बुडलेल्या मुलांना बोटीवर चढवुन अन्या बोटितुन किनार्‍यावर पाठवले. त्यानंतर समुद्रात जाळी मारुन घेतली.लाईफ जॅकेट दिले. बोटीखाली अडकलेल्या दोन विद्यार्थीनींना खेचुन काढुन जीव वाचवण्यचा प्रयत्न केला. त्या दोघींना दवाखान्यात पाठवुन उपचार सुरु केले.

विद्यार्थ्यांची बोट बुडाल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने सर्व पालकांनी डहाणू किनारा गाठला. भयभीत पालक आणी रहिवाशांमुळे किनार्‍यावर एकच गर्दी उसळली होती. कोस्टगार्डने हॅलिकॉप्टरच्या मदतीने शोध कार्य सुरु केले. मच्छिमार बांधव, पोलिस प्रशासन, नगरपरिषद कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि समाज सेवकांनी तत्परतेने मदत केल्यामुळे शोधकार्याला गती मिळाली.
जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार मनीषा चौधरी, आमदार रविंद्र फाटक, आमदार पास्कल धनारे, आ. अमित घोडा, नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी कॉटेज हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपुस केली.

विद्यार्थी आणि बोट चालकांची नावे :-

टिना सुभाष माह्यावंशी, सोनल तडवी, वैशाली मायावंशी, किर्ती मायावंशी, करिना मायावंशी, पल्लवी भिडे, सपना वाघ, डेसी झाईवाला, सोनी मोर्या, हेमंत सुरती, मसुदा शेख, आरती  सुरती, सना खान, जानव्ही वाडीया, प्रियांका गुप्ता, सुमन जयस्वाल, बिन्शा मुन्शी, तेजल माच्छी, उर्मिला शहा, सोनी मोरया, बोटचालक सुरेश अंभिरे 

जीवरक्षकांची नावे :

नंदकुमार विंदे, गणेश मर्दे, जयकिसन तामोरे, स्वप्निल विंदे, चंदन मेहेर, धनेश आकरे, गणेश पागधरे, सुधीर खाकरे, संजय वेडगा, विनोद, सत्तार या तरुणांनी समुद्रात बुडालेल्या विद्यार्थांना वाचवण्याचे धाडस केले.