होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परीट समाज आरक्षण : प्रलंबित प्रश्नी तीव्र रणशिंग फुंकणार

परीट समाज आरक्षण : प्रलंबित प्रश्नी तीव्र रणशिंग फुंकणार

Published On: Aug 19 2018 3:57PM | Last Updated: Aug 19 2018 3:55PMनवी मुंबई :प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील परीट (धोबी) समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे आजपर्यंतच्या सत्तेत आलेल्या सर्वच सरकारांनी वारंवार दुर्लक्ष केले आहे. परीट (धोबी) समाजाचे हिरावून घेतलेले एस.सी. प्रवर्गाचे आरक्षण पुन्हा बहाल करावे या मागणीवर वेळोवेळी निव्वळ खोटी आश्वासने देण्यात आली. यापुढे शासनस्तरावर साम, दाम, दंड व भेद नीतीने पाठपुरावा करावा व तीव्र रणशिंग फुकावे असा निर्धार परीट (धोबी) समाजाच्या राज्याच्या चिंतन बैठकीत करण्यात आला.

मुंबई- ठाणे परीट (धोबी) सेवा मंडळाच्या वतीने परीट समाजाच्या आरक्षणासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी आज, रविवार,(१९ ऑगस्ट) रोजी शांताक्रुज येथील पाठक सभागृहात राज्यातील समाजाच्या दोन्ही गटाच्या व आरक्षणासाठी काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे चर्चासत्र संपन्न झाले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक रमाकांत कदम हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम महाडिक यांनी केले. वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डी.डी.सोनटक्के,  समाजाचे  राज्याध्यक्ष राजेंद्र खैरनार, आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे, आरक्षण हक्क परिषदेचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे, प्रदेश युवा अध्यक्ष संतोष भालेकर, अँड.राणी रंधे-तळेकर, वैशाली केळझरकर आदींनी आरक्षण लढ्याच्या संदर्भात आपल्या भूमिका मांडल्या. 

दरम्यान, रस्त्यावरील लढाईसह न्यायालयीन लढा उभारण्याचे यापुढे राज्याच्या राजधानीतून म्हणजे मुंबईतून तीव्र रणशिंग फुंकण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. मुंबई ठाणे परीट (धोबी) समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष किसन मल्हारी भालेकर, कार्याध्यक्ष संजय सुर्वे, सचिव संतोष सवतीकर, संजय अंबावले, मंगलदास श्रीनिवास, अजित पावसकर, राजाराम कडू, मुरलीधर शिंदे आदींनी यश्वस्वीतेसाठी परिश्रम घेतले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन संतोष सवतीरकर यांनी केले. चर्चासत्राला राज्यभरातील परीट समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.